पुणे : एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र दुस-या बाजुला संविधान जाळणा-यांची साधी चौकशी देखील केली जात नाही. यामाध्यमातून मनुवाद पुढे येतो आहे. शेतातील आंबे खावून मुले होतील. अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणा-या विचारांना स्थान दिले जात असून देशाच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेत भुजबळ यांनी आपल्या रोखठोक शैलीत समाजातील बदलत्या परिस्थितीचा वेध घेतला.ते म्हणाले, नायगाव किंवा महात्मा फुलेंचा हा वाडा आमच्यासाठी उर्जा केंद्र आहेत. आमच्या हातून घडलेल्या भल्या-बु-या कामांचा आढावा आम्ही या उर्जा केंद्रावर घेत असतो. आगामी कार्यासाठी सज्ज होत असतो. ही उजार्केंद्र, स्मारक भव्य स्वरुपात येथे आकारास यावी यासाठी भविष्यात काम करु. दगडूशेठ गणपती येथे हजारोंच्या संख्येने अर्थवशीर्ष पठण होते. परंतु, स्त्रीयांच्या प्रगतीसाठी ज्या स्त्रीने भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली त्याकडे कोणत्याच भगिनीचे लक्ष जात नाही, ही खेदाची बाब आहे. छत्रपती शाहु महाराजांनी पहिल्यांदा देशात आरक्षणाची चळवळ उभी केली. आणि आरक्षण दिले. मात्र, प्रत्यक्षात आरक्षणाची अंमलबजावणी करणारा देशातील दुसरा नेता म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. याबरोबरच महिलांना आरक्षण देण्यासंबंधी आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण करण्यासंबंधी त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले. ‘‘एक दिन वक्त आपका गुलाम होगा’’ असे सांगत मनुवादावर चालणा-यांचा प्रवास थांबवावा लागेल. कारण केवळ फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल. असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
संविधान जाळणाऱ्यांची पोलिसांकडून साधी चौकशीसुद्धा नाही : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 6:13 PM
एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, दुस-या बाजुला...
ठळक मुद्देअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल