निलेश राऊत-
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांत जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे पुण्यात भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. मात्र, विलगीकरणासाठी (क्वारंटाईन) महापालिकेने उभारलेली कोविड केअर सेंटर मात्र रिकामी आहेत. याठिकाणी दोन हजारांवर रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. गंभीर नसलेल्या रुग्णांनी खऱ्या गरजूंसाठी जागा सोडून कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याची अपेक्षा प्रशासन व्यक्त करत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ४६ हजार कोरोनाबाधित रुग्णांना इतरांपासून विलग करून बरे करण्यात यश मिळाले हाेते. मात्र, दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा फैलाव हा सोसायट्यांमध्ये आहे. त्यातील अनेकांची आर्थिक ऐपत असल्याने ते एकतर गृहविलगीकरणाचा (होम आयसोलेशन) पर्याय स्वीकारतात किंवा रुग्णालयात दाखल होतात. सध्या पुण्यातील ५४ हजार रुग्णांपैकी ४५ हजार होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ६३१ जण आहेत.
गृहविलगीकरण पाळले जात नसल्याने फैलाव
पहिल्या लाटेत प्रामुख्याने वस्त्यांमध्ये कोरोनाचा फैलाव असल्याने कोरोनाची टेस्ट केल्यावर लोक केेअर सेंटरमध्ये पाठविले जात होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर गंभीर नसणाऱ्यांना तेथेच ठेऊन उपचार केले जात होते. मात्र, सध्या खासगी लॅबमध्ये टेस्टींगचे प्रमाण वाढले आहे. शासकीय केंद्रातही टेस्ट केल्यावर कोणी क्वारंटाइन होत नाही. त्यामुळे रिपाेर्ट येईपर्यंत रुग्ण फिरत राहतो. सध्या ९० टक्के टेस्टींग खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून होत आहे़
ट्रेसिंग नाही, आयसोलेशनही नाही
खासगी प्रयोगशाळांकडून तपासणी झाल्यावर संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती प्रशासनास दिली जाते़ त्या रुग्णांचे संपर्क क्रमांक अथवा पत्तेही अर्धवट असल्याचे दिसून आले़ सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम होतच नाही. आरोग्य यंत्रणा लसीकरण मोहिमेत गुंतली गेली आहे़ परिणामी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर कोणाच अंकुश राहिला नसून, त्यांचा मुक्त वावर मात्र इतरांना संसर्ग देऊन जात आहे़
----------------------