भोर : नगरपालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची करवाढ न करता सन २०१६-१७ चा सुमारे ३ कोटी ६ लाख ९८ हजार ९१० रु . शिलकेच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली व मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. भोर नगरपलिकेच्या शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती. या वेळी मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष गजानन दानवले, तानाजी तारू, अॅड. जयश्री शिंदे, उमेश देशमुख, किसन वीर, तृप्ती किरवे, मंजू कांबळे, यशवंत डाळ, मनीषा शिंदे, सुनीता बदक, देविदास गायकवाड, विजयालक्ष्मी पाठक, राजश्री रावळ, शुभांगी पवार, मीनाक्षी रोमण, संजय जगताप व कर्मचारी उपस्थित होते.भोर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शिलकेसह २३ कोटी ८२ लाख २४ हजार ९१० रु. रक्कम जमा बाजूस दाखविण्यात आली आहे. तर, खर्च बाजूला करून २० कोटी ७५ लाख २६ हजार इतकी रक्कम दाखविण्यात आली आहे. शहरातील रस्त्यावर दिवे लावणे, घनकचरा विल्हेवाट यासह इतर सेवांमधून नगरपालिकेला कोणत्याच प्रकारचे उत्पन्न मिळत नसल्याने शहरातील नळ पाणीपट्टीत १० टक्के वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवले होते. मात्र, या करवाढीला विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केल्याने प्रस्तावित पाणीपट्टी वाढ रद्द करण्यात आली. यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, सेवा हमी कायदा लागू झाला असून, त्यासाठीची फी शासन निर्णयानुसार नागरिकांकडून घेण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात कुठलीही कर वाढ नाही
By admin | Published: March 10, 2016 12:52 AM