लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आरक्षणाशिवाय प्रवासच नाही, असा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासावर बंदी नसल्याने आरक्षणाला गर्दी होते आहे. नियोजन करूनच प्रवास होत असला, तरी ती संख्याही मोठी असल्याने स्थानकांमध्ये रोजच बऱ्यापैकी गर्दी असतेच.
पुण्यातून दिवसभरात रोज १० गाड्या सुटतात. मुंबई, कोल्हापूर, कलकत्ता, मिरज, तिरूपती इकडे या गाड्या जातात. त्याशिवाय आठवड्यातून दोनदा, तीनदा अशा ३२ गाड्या आहेत. पुण्यातून एकूण ४२ गाड्या सुटतात. तसेच दिवसभरात म्हणजे २४ तासांत पुणे स्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांची संख्या १२० आहे.
आरक्षण केल्याशिवाय तसेच ते कन्फर्म असल्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रशासनाकडून प्रवेशच दिला जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी तिकीट आरक्षित असलेलाच असतो. पुण्यातून रोज जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण २५ हजार आहे.
मुंबईकडे जाणारे प्रवासी अर्थातच जास्त आहे. तसेच बिहार, मध्य प्रदेश या राज्यात पुण्यातून जाणाऱ्याची संख्याही बरीच आहे. त्या तुलनेत राज्यांतर्गत प्रवासाचे आरक्षण कमी आहे. त्यातही नागपूर, अमरावतीकडे फारसा ओढा दिसत नाही. एरवी गाड्यांना असते तशी गर्दी स्थानकांमध्ये दिसत नाही. काही गाड्यांचे आरक्षण फुल होते, तर काही गाड्यांमध्ये जागा आहे तेवढे आरक्षण होत नाही.
आरक्षणासाठी आता तिकिटाची पूर्ण रक्कम द्यावी लागते. त्यामुळे तिकीट रद्द करण्याचे प्रमाण कमी आहे. तिकीट किती दिवस आधी रद्द केले त्यावर किती टक्के रक्कम परत मिळेल ते अवलंबून आहे. मात्र तिकीट रद्दचे प्रमाण कमीच आहे.
रेल्वेत स्लिपर कोच आणि सीट अशी रचना असते.लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्लिपर कोच असतात. त्याचे आरक्षणही तसेच होते. मध्ये उभे राहून, किंवा दारात उभे राहून प्रवास करण्याची मुभाच नाही. एरवी असा प्रवास होत असल्याने गाड्यांचे डबे गर्दीने ओसंडून वाहत असतात, पण आता गाड्यांची तपासणी होते, असे तिकीट कन्फर्म नसलेले प्रवासी नसतातच, असले तरी ते लगेच बाहेर काढले जातात, त्यामुळे सगळ्याच रेल्वे गाड्या कधी नव्हे ते शिस्तीत व गोंधळ गर्दीविना धावत आहेत.
----
आरक्षण असल्याशिवाय प्रवास नाही
२४ तासातील गाड्या- १२०
पुण्यातून रोज सुटणाऱ्या १०
आठवड्यातून एकदा दोनदा- ३२
आरक्षण जास्त-मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बिहार
आरक्षण कमी-राज्यातंर्गत, नागपूर अमरावती
--
आरक्षण ऑनलाईन पद्धतीने होते. वेगवेगळ्या ठिकाणी होते. बहुतेक गाड्या सध्याही फुल असतात. जागा उपलब्ध आहेत, त्यापेक्षा जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांना पुढच्या तारखेचे आरक्षण मिळते. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या घटलेलीच आहे.
- मनोज झंवर, मुख्य जनसंपर्क अधिकारी