लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील ७ कोटी कोंबड्या बर्ड फ्लूच्या सावटाखाली आहेत. या आजारावर लस नसल्याने पशुसंवर्धन विभागाने काळजी हाच उपाय असल्याचे सांगत पोल्ट्री फार्म चालकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
स्थलांतरित पक्ष्यांकडून हा आजार देशात आल्याचा निष्कर्ष आतापर्यंतच्या तपासणीवरून काढण्यात आला आहे. प्रामुख्याने कोंबड्यांमध्ये तो वेगाने पसरतो. आजार झालेल्या पक्ष्याच्या विष्ठेतून अन्य पक्ष्यांना तो होतो. पोल्ट्री फार्ममध्ये एकाच ठिकाणी शेकडो-हजारो कोंबड्या असल्याने, त्यांच्यात हा आजार पसरण्याचे व त्यातून मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या आजारावर देशात लस नाही. परदेशात असली, तरी ती यशस्वी झाल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळेच अधिक काळजी घेतली जात आहे.
आतापर्यंतच्या तपासणीवरून कावळे, बगळे, पाणवठ्यावरील पक्षी यांच्या विष्ठेतून आजाराचा प्रसार वेगाने होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यांच्याकडून पाळलेल्या कोंबड्यांमध्ये लागण होत आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म चालकांनी आपल्या कोंबड्या अन्य पाळीव पक्ष्यांच्या संपर्कात न येऊ देण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे यांनी बर्ड फ्लूच्या नियंत्रणाचे प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
चौकट
सात कोटी कोंबड्या राज्यात
राज्यातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची संख्या ७ कोटीपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागात घराघरांमध्ये पाळण्यात येणाऱ्या कोंबड्या सुमारे २ कोटी आहे. पुणे जिल्ह्यातच २५ हजारांपेक्षा जास्त पोल्ट्री फार्म असून, यात १ कोटी ८६ लाख कोंबड्या आहेत. या कोंबड्यांना बर्ड फ्लूपासून वाचविण्यासाठी काळजी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.
चौकट
पोल्ट्री चालकांसाठी सूचना
- पोल्ट्रीच्या भिंतीना चुना लावून घ्या.
- पोल्ट्रीभोवती सोडियम क्लोराइड द्रावणाची फवारणी करा.
- पोल्ट्री बंदिस्त करावी.
- अन्य पक्ष्यांचा संपर्क पोल्ट्रीला होऊ देऊ नका.
- आजारी कोंबड्यांना त्वरित बाजूला काढा.
- एकापेक्षा जास्त पक्षी अचानक मेल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवा.