सोमेश्वरनगर : ज्वाऱ्या गुडघ्याएवढ्या आल्या अन् जळून गेल्या... गावाकडं जितराबांना प्यायला पाण्याचा एक ठिपूस पण नाय... माणसांनाच आठ दिसातनं एकदा पाणी मिळतं... तिथं जितराब कशी जगवणार... हंगामात साठवलेलं वाड हाय तवर चारायचं... हिरवा चारा घेयला आमच्याकडं कुठलं पैसं... गावाकडं पाणीच नसल्यानं हिथंच राहणार... निदान हाताला काम आणि जितराबांना चारा तरी मिळतोय, ही भावना आहे, निवडुंग (ता. पाटोदा, बीड) येथील चंद्रकला अशोक सुळे यांची... सोमेश्वर कारखान्यावर यावर्षी ऊसतोडणी करण्यासाठी आलेल्या हजार ते बाराशे कुटंबांपैकी जवळपास १५० ते २०० कुटुंबे अद्याप गावाकडे गेलीच नाहीत. पाणी नसल्याने सोमेश्वर कारखान्यावरच त्यांनी तळ ठोकला आहे. गावाकडे का गेला नाही, असे त्यांना विचारले असता, गावाकडे जाऊन काय माती गिळायची का? असेच उत्तर या कामगारांकडून मिळत आहे. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम संपून आठ दिवस झाले. त्यामुळे ज्या ऊसतोड कामागारांना गावाकडे थोडीफार पाण्याची सोय आहे, अशी कुटुंबेच गावाकडे गेली आहेत. मात्र बरीचशी कुटुंबे गावाकडे जाण्याचे नावच घेत नाहीत. दर वर्षी मात्र कारखाना कधी बंद होतोय, गावाकडे कधी जातोय, या विचारात असणारा ऊसतोडणी कामगार यावर्षी मात्र गावाकडे जाण्यासाठी उत्सुक दिसला नाही. येथे राहून कमीत कमी माणसाला व जितराबाच्या पोटाला व पाणी तरी मिळेल. तर शेतावर कामाला जाऊन चार पैसे तरी मिळतील या आशेवर अनेक कुटुंब पाऊस पडेपर्यंत येथेच थांबली आहेत. तांबाराजोरी (ता. पाटोदा) येथील सोमनाथ तांबे सांगतात, गावातील इतर विहिरीचे पाणी सरकारी विहिरीत टाकले आहे. त्यातून रोज दीड ते दोन तास गावाला पाणीपुरवठा होतो. त्यावर समाधान मानायचे. जितराबं कशी बशी जगवायची, विकून काय होणार. पुढील वर्षाला पुन्हा खरेदीला कुठून पैसे आणायचे. तर दत्तू तोडकर म्हणाले, गावाला पाणीच नाही म्हणून पाऊस पडेपर्यंत इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
गावाकडं पाणीच न्हाई... तिथं जाऊन करायचं काय?
By admin | Published: March 17, 2017 2:05 AM