पुणे : कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून वर्ष झाल्यानंतरही रुग्णांवर बहिष्कार घालण्याच्या घटना घडतच आहेत. सोसायटीच्या सदस्यांनी त्रास दिल्याची तक्रार पुण्यातील एका महिलेने केली आहे. सोसायटीच्या फलकावर नाव लिहून कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच, वारंवार ईमेल पाठवून त्रास दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तर या महिलेने पॉझिटिव्ह असल्याचे लपवले तसेच विलगीकरणाचे नियम पाळले नसल्याचा दावा सोसायटीच्या सेक्रेटरीने केला आहे.
पुण्यातल्या 'कोणार्क इन्द्रायु' या प्रशस्त सोसायटीमध्ये ही महिला राहत आहे. या महिलेला फेब्रुवारीच्या शेवटी कोरोना झाला असल्याचे निदान झाले. यानंतर सोसायटीमध्ये फलकावर आपले नाव लिहिले गेले. तसेच कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही ते हटवले गेले नाही असा दावा महिलेने केला आहे. याबरोबरच आपल्याला वारंवार विलगीकरणाबाबत सूचना करणारे ईमेल्स पाठवून त्रास दिल्याचाही दावा या महिलेने केला आहे.
'लोकमत'शी बोलताना त्या म्हणाल्या की, साधारण २२ दिवसांपूर्वी मला कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर माझे नाव सोसायटीच्या दारावर असलेल्या बोर्डावर लिहिण्यात आले. त्यावेळेस मी आक्षेप घेतला नाही. मात्र माझा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही हे नाव खोडायला नकार देण्यात आला. तसेच मला भेटायला येणाऱ्या नागरिकांनाही मनाई करण्यात आली. इतकेच नाही तर घरी काम करणाऱ्या लोकांनाही प्रवेश नाकारला गेला.माझा अहवाल प्रत्यक्षात दाखवावा अशी मागणी ते वारंवार करत राहिले. पण मी त्यांना माहिती देत होते. अहवाल दाखवण्याची जबरदस्ती ते करु शकत नाहीत असे मी त्यांना सांगितले.
सोसायटीच्या सेक्रेटरींनी मात्र या महिलेने आपण पॉझिटिव्ह असल्याचे लपवल्यानेच हे पाउल उचलावे लागल्याचे म्हणले आहे. लोकमतशी बोलताना सौमित्र सेन सेक्रेटरी , कोणार्क इन्द्रायु ,म्हणाले की, महिलेने कोरोना झाल्याची माहिती दिली नाही. तिचे मुले बाहेर खेळत होती. महापालिकेने आम्हाला कळाल्यानंतर हे स्पष्ट झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कळावे म्हणून आम्ही बोर्ड वर नाव लिहिले. विलगीकरणाची माहिती कळावी म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. त्यांचे रिपोर्ट येण्यापूर्वी ६० तास घरकामगार देखील घरात जात होते. याने सगळ्यांना धोका होत होता. इतर सर्व लोकांना आम्ही मदत करत आहोत. फक्त या महिलेला त्रास होण्याचे कारण काय?
दरम्यान, आपण महापालिकेच्या सूचनेनुसार वागत होतो. त्यांनी सोसायटीच्या रहिवाशांना माहिती देऊ असे कळविले होते. मात्र, त्यांनी काही त्याबाबत कळविले नाही. तसेच ज्यादिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यादिवसापासूनच घर, कामगार महिलांना कामावर बोलावले नाही, असा दावा या महिलेने केला आहे.