जेजुरी : पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. आज सोनोरी गावठाण व सात वाड्या, दिवे गावठाण आणि तेरा वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ११ हजार लोकसंख्या सध्या पाण्याची मागणी करीत आहे. तर सिंगापूर, उदाचीवाडी, गुरोळी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, राजुरी, बहिरवाडी, राख व वाड्या-वस्त्याही तहानलेल्या आहेत. याठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे २८ फेऱ्या मारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, दिवे या गावांना टँकर सुरू करण्यात आले होते. तर सोनोरी, मावडी, बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी, निळुंज, सोमुर्डी नायगाव, टेकवडी, झेंडेवाडी या गावांतील टँकरचे प्रस्ताव दाखल होते. त्या मानाने यंदा मागणी कमी आहे. गेल्या वर्षी पावसाने उशिरा, पण दमदार हजेरी लावली होती. यातच पाणी फाऊंडेशन आणि शासनाच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारण झाल्याने अजूनही विहिरीतून पाणीसाठा राहिल्याने टंचाई कमी प्रमाणात जाणवत असली तरीही पुढील तीन-चार महिने पाणी पुरेल असे नियोजन करावे लागणार आहे. उन्हाळा ही अत्यंत कडक असून, तालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणीसाठा शिल्लक आहे. इतरत्र गावोगावचे पाझर तलाव, लघू पाटबंधारे विभागाचे जलाशय आज कोरडे ठाणठणीत आहेत. अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोतही आटलेले असल्याने ग्रामपंचायतींसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नाझरे जलाशयात केवळ ४२ टक्केच (३४२ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा आहे. जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ १४२ दशलक्ष घनफूट (२४ टक्के) एवढाच उपलब्ध आहे. नाझरे जलाशयावरून सुमारे ५० गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजना सुरू आहेत. पुढील चार महिने पाणी पुरवण्याचे नियोजन करावे लागणार आहे. येथून जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आयएसएमटी कंपनी, मोरगाव व १६ गावे, नाझरे व पाच गावे, या योजनांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पारगाव व २३ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना वीज बिल थकल्याने बंद आहे. भविष्यात या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असून, ही योजना ही लवकरात लवकर सुरू करावी लागणार आहे. तालुक्यातील गराडे केवळ १.९२ दशलक्ष घनफूट, पिलाणवाडी जलाशयात २७.७६ दशलक्ष घनफूट, वीरनाला ४०.१६. दशलक्ष घनफूट, घोरवडी २६.७८ दशलक्ष घनफूट, पिंगोरी १५.२७ दशलक्ष घनफूट, माहूर ३५.९८ दशलक्ष घनफूट असा पाणीसाठा आहे. या जलाशयावरून परिसरातील पाणी योजनांना पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरीही काही गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्याही तक्रारी वाढू लागल्या आहेत. अनेक योजनांच्या दुरुस्त्या अनेक वर्षांपासून न झाल्याने योजनांवरील गावांनाही पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागलेल्या आहेत. काही योजनांची वीजबिले थकल्याने या योजनांतून पिण्याचे पाणी उचलता येत नाही. इतर गावांची पिण्याच्या पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र स्वरूपाची होऊ लागलेली आहे. कऱ्हा नदीलगतच्या काही गावांना आज जरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नसली, तरी भविष्यात या ठिकाणीही टँकर सुरू करावे लागणार आहे. याशिवाय इतर गावातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढू लागली आहे. पुढील तीन ते चार महिने टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे.
मार्च महिन्यातच इथे जाणवतेय पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 6:03 PM
गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे २८ फेऱ्या मारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता.
ठळक मुद्देतालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणीसाठा शिल्लक पुढील तीन ते चार महिने टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार