लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वाईन फ्ल्यू, सार्सच्या तुलनेत संसर्गजन्य आजाराचा धोका कोरोना आपत्तीने संपूर्ण देशाला दाखवून दिला व याला पुणे शहरही अपवाद ठरले नाही़ एका वर्षात सुमारे १२ लाख संशयितांची तपासणी, २ लाख ९ हजार ८३ कोरोनाबाधित, ४ हजार ८९७ जणांचा मृत्यू, रूग्णालयात जागा मिळण्यासाठीची धावाधाव़ एवढे अनुभव गेल्या एक वर्षात कोरोना आपत्तीने आपल्याला दिले़ परंतु, एवढे होऊनही गेल्या महिनाभरापासून पुन्हा तीच कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे़ यामुळे आजही आपण कोरोना आजाराला गांभिर्याने घेतल्याचे चित्र शहरात दिसत नसल्याचेच स्पष्ट होत आहे़
शहरात डिसेंबर,२०२० नंतर कोरोना संसर्गाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला़ त्याच काळात विविध कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसही बाजारात आल्या आणि आपण सुटकेचा नि:श्वास सोडला़ सार्वजनिक कार्यक्रमांची रेलचेल, गर्दी करून विनामास्क वावर, लग्न समारंभ व कोरोना आजार आता काहीच करू शकणार नाही या विश्वासाने आपण गाफील झालो़ परंतु, गेल्या एक महिन्यापासून कोरोना आजाराने आपल्याला पुन्हा वेठीस धरले असून, आज एका वर्षानंतर पुन्हा दररोज हजाराच्या जवळपास कोरोनाबाधितांची वाढ पोहचली आहे़ एक हजाराच्या आत आलेली सक्रिय रूग्ण संख्या (अॅक्टिव्ह पेशंट) महिनाभरात ६ हजार ७३५ वर गेली आहे़ तर जेथे रूग्णांना केवळ शंभर दिडशे आॅक्सिजन बेडची गरज होती ते आता ६९० वर गेले आहेत़ तर गंभीर रूग्णही ३५८ वर पोहचले आहेत़
परिणामी बंद केलेले कोविड सेंटर, जम्बो हॉस्पिटल आता पुन्हा सुरू करणे क्रमप्राप्त झाले आहे़ कोरोना प्रतिबंधक लस आली म्हणजे आपणास कोरोना होणार नाही हा गैरसमज असून, लस घेतल्यानंतर त्या लसीमुळे तयार होणाºया प्रतिकारशक्ती तयार होण्यास काही कालावधी लागतो याचा आपण विसर करून चालणार नाही़ यामुळे आजही मास्कचा वापर, गर्दी न करणे, वैयक्तिक अंतर ठेवणे, लक्षणे असल्यास लागलीच उपचार घेणे ही पथ्ये पाळली तरच एका वर्षाने पुन्हा डोके वर काढलेल्या कोरोना आपत्तीला आपण हद्दपार करण्यास यशस्वी होऊ शकतो़
----------------------