मानसी जोशी/किमया बोराळकर
पुणे : ‘रात्री कामावरून घरी येताना रस्त्यावर साधे दिवेही नसतात.’ ‘राहता वाडा पडायला झाला आहे, सगळे म्हणतात सरकारनेच यावर काही निर्णय करायला हवा,’ असे मत कसब्यातील महिलांनी व्यक्त केले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘ती’ला बोलते केले. थोडा विश्वास मिळाल्यावर ‘ती’ने बरेच काही भरभरून सांगितले.
रस्ता चालायला आहेत की दुकानदारांना त्यांचा माल मांडून ठेवायला? गर्दीच्या रस्त्यांवर महिलांसाठी किमान एकतरी स्वच्छ असलेले प्रसाधनगृह असावे. या आहेत कसबा, शनिवार, नारायण, सदाशिव अशा पेठांमध्ये राहणाऱ्या 'महिलांच्या समस्या.
नाना पेठ, गुरूवार पेठ, लोहियानगर इथली स्थितीही काही वेगळी नाही. त्यांच्या अडचणी आणखीच वेगळ्या. देशी दारूचे इथले सरकारमान्य दुकान बंद करता येईल का? फोन केला, तर पोलिस लगेच का येत नाहीत? यासारख्या त्यांच्या समस्या आहेत.
''मला माहिती नाही कोण उमेदवार उभे आहेत. घरातले सांगतात त्याला मतदान करायचे. काम करणारा माणूस हवा. सगळे सारखेच असतात. - अपर्णा मोटकर''
''सार्वजनिक शौचालय आहेत; पण ती नियमित स्वच्छ होत नाहीत, कितीही वेळा सांगितले तरी महापालिकेचे कामगार येत नाहीत. - सारिका झुरंगे''
''आम्ही कामाला जातो रात्री येताना उशीर होतो. आमच्या भागात विजेचे खांब नाही, कितीवेळा अर्ज केले; पण कोणीच काही करत नाही. - जया पवार''
''एक अधिकृत कचराकुंडी होती तीही पाडून टाकली. पर्यायी व्यवस्था काहीच नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग पडून असतात. - करुणा राजपूत''
''मेट्रो येणार आहे म्हणतात. आम्हाला तिचा काय उपयोग होणार? हाताला काम नाही. त्या मेट्रोने जायचे कुठे? महागाईने रोजचे जगणे मुश्किल झाले आहे. - पद्मा माने''
''मुलगा अपघातात गेला. विधवा सुनेला नोकरी देतो म्हणाले. मात्र, काहीही झाले नाही. - शकुंतला काटे''
''आमचा वाडा आहे. ताे पडायला झालाय. त्याच्या विकासासाठी सरकारी निर्णय व्हायला हवे. - लक्ष्मी पाटील''
''पाण्याची काही सोय नाही. सकाळी पाणी गेले की, दुसऱ्या दिवशीच येते. २४ तास पाणी देतो म्हणतात. ते गेले कुठे त्यांनाच माहिती. - मंजुळा कुंभार''
''शौचालयाची कसलीच व्यवस्था नाही. सगळे पाणी परत येते. सगळीकडे घाण वास येतो. खूप वेळ सांगून, पण आमच्या समस्यांचे पुढे काही केले जात नाही. - शालिनी दौंडकर''
''रस्ते नीट नाहीत. सगळ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे. मला तर मतदान कशासाठी करायचे असा प्रश्न पडला आहे. - मंगल दरोडे''
''पेन्शनचे पैसे मिळण्यात सतत अडचणी येतात. सहा महिन्यांपूर्वीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. खरे तर अशा अडचणी यायलाच नकोत, मात्र येतात. त्याचे काय करायचे समजत नाही. - प्रभा मानकर''