हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील उड्डाणपूल झाला पाहिजे : डॉ. अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:25 PM2020-03-14T13:25:22+5:302020-03-14T13:28:54+5:30
रेल्वे व महापालिका अधिकाऱ्यांनी दिरंगाई टाळून युद्धपातळीवर या उड्डाणपुलाचे काम करावे..
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील रेल्वेफाटक क्र. ८ वरील उड्डाणपुलाचे काम करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वेच्यापुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्याशी चर्चा करून अनेक मागण्या व सूचना केल्या.
या कामासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी वर्ग केल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी शर्मा यांना केली. ‘आवश्यकता भासल्यास वा काही अडचणी आल्यास सांगा. मी स्वत: उपस्थित राहीन; मात्र हा उड्डाणपूल झाला पाहिजे,’ असे खासदार डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील नवीन रेल्वे स्थानकाला दिलेले सासवड रोड हे नाव बदलून काळेबोराटेनगर नाव द्यावे, अशी मागणी खासदार कोल्हे व नगरसेवक ससाणे यांनी केली. हे रेल्वे स्थानक काळेबोराटेनगरच्या हद्दीत असल्याने तेच नाव देणे योग्य ठरेल, असे मत खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती शर्मा यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी जनतेच्या सुविधेसाठी सिंहगड, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेसच्या वेळा बदलण्याची मागणी केली. हा प्रश्न मुंबई उपनगरीय रेल्वे वेळापत्रकाशी संबंधित असल्याने महाव्यवस्थापकांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील ससाणेनगर-हांडेवाडी रस्त्यावरील रेल्वेफाटकाच्या मुख्य भूमिगत रस्त्याच्या (अंडरपास) कामाचा आढावा या वेळी घेण्यात आला. सध्या या ठिकाणी दोन भूमिगत रस्त्यांची कामे सुरू असली, तरी मुख्य रेल्वे फाटकातील भूमिगत रस्ता (अंडरपास) करावाच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार डॉ. कोल्हे यांच्या या मागणीला प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने यापूर्वीच परवानगी दिली आहे; मात्र पुणे महापालिका उड्डाणपूल करायचा की भूमिगत रस्ता, याचा निर्णय घेत नसल्याने विलंब होत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या विषयावर रेल्वे व पुणे महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न आपण मार्गी लावू, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पुणे महापालिकेने जीएडी सादर केला आहे, त्याला तत्काळ मंजुरी देण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. त्यावर माहिती देताना शर्मा यांनी सांगितले, की महापालिकेने यापूर्वी सादर केलेल्या ‘जीएडी’मध्ये त्रुटी होत्या.
..............
त्याची पूर्तता करून चार दिवसांपूर्वी महापालिकेने जीएडी सादर केला आहे. तांत्रिक तपासणी करून लवकरात लवकर मंजुरी देण्याच्या सूचना देण्यात येतील. घोरपडी रेल्वे फाटकावर होणारी वाहतूककोंडी हा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.
...........
त्यामुळे रेल्वे व महापालिका अधिकाऱ्यांनी दिरंगाई टाळून युद्धपातळीवर या उड्डाणपुलाचे काम करावे, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
............
या बैठकीला नगरसेवक योगेश ससाणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे, नारायण पुरुषवाणी, मनोज बजाज, कोरेगाव मूळ ग्रामस्थांचे प्रतिनिधी मुकिंदा काकडे, सचिन कड हे उपस्थित होते.