अवसरी खुर्द येथे जुन्नर, शिरूर, खेड व आंबेगाव तालुक्यांसाठी होत असलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या आढावा बैठकीनंतर आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखानाचे संचालक संतोषनाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळ इत्यादी जुन्नर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
अवसरी खुर्द येथे उभे राहत असलेल्या शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालयाप्रमाणे छोट्या स्वरूपातील कोविड सेंटर नारायणगाव येथे सुरू व्हावे, यासाठी डॉक्टर, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करावेत. जुन्नर तालुक्यात एक अद्ययावत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता आहे. यासाठी डॉ. डोळे नारायणगाव येथील आपली दोन एकर जमीन मोफत देणार आहे. हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मदत वळसे पाटील यांनी करावी. तसेच शिरोली येथे लहान मुलांचे कोविड रुग्णालय उभे करत असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साहित्य पुरवठा करावा. नारायणगावचे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व्हावे, अशा मागण्या जुन्नर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केल्या.
अवसरी खुर्द येथील शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालय उत्तर पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे. या सेंटरमध्ये जुन्नरच्या लोकांची व्यवस्था व्हावी यासाठी एक आरोग्यदूत असणार असून, आरोग्यदूत जुन्नर तालुक्यातील लोकांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे यासाठी काम करणार आहे. ठिकठिकाणी कोविड सेंटर काढून सर्व सुविधा देणे शक्य होणार नाही यासाठी शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालय चार तालुक्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष आहे हे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदारांच्य ते सतत संपर्कात असतात. त्यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू झाले. तसेच आदिवासी लोकांसाठी जुन्नर तालुक्यात पहिले कोविड केअर सेंटर आश्रमशाळेत सुरू केले. जुन्नर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी आम्ही वळसे पाटील यांची भेट घेतली. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. लोकांशी असलेली बांधीलकी जपण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षांचे नेते कोरोनावर मात करण्यासाठी पक्षविरहीत एकत्र येऊन काम करत आहोत, असे या भेटीवर जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यात कोरोना परिस्थितीतील गरजांसंदर्भात जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके व डॉ. डोळे यांनी दिलीप वळसे पाटील यांची घेतलेली भेट.