व्यावसायिक महाविद्यालय विविध शीर्षकाखाली शुल्क आकारणी करून विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्काची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होती. त्यावर राज्य सरकारच्या सूचनेनुसार शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शिक्षण शुल्क आणि विकास शुल्क अशा ठराविक शीर्षकाखाली शुल्क वसूल करण्याचे आदेश काढले होते. मात्र, त्याचा गैरफायदा घेत अनेक व्यावसायिक महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरल्याशिवाय प्रवेश देणार नाही, असे सांगितले. परंतु, नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शुल्क वसुली करू नये, अशी स्पष्टता प्राधिकरणाने सुधारित आदेशात दिली आहे. याबाबत कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता.
---
महाविद्यालयाविरोधात तक्रारीचे आवाहन
मान्यता दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या महाविद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांनी fra.govmh@gmail.com या संकेतस्थळावर तक्रार करावी, असे आवाहनही शुल्क नियामक प्राधिकरणाने केले आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क वसुली करणाऱ्या महाविद्यालयांना चपराक आहे.