Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:35 PM2024-07-15T12:35:55+5:302024-07-15T12:36:18+5:30
Chagan Bhujbal - महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग सुरू असून एकत्र बसून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, अशी सुबुद्धी सर्व विरोधी पक्षांना मिळो
बारामती : आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गाजत आहे. काही लोकांचा विचार आहे की आपापसात दंगे व्हावे, असा प्रयत्न आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत; पण आमचं म्हणणं आहे की, ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मांडली. बारामती येथे राष्ट्रवादीच्या वतीनं बारामतीमध्ये राज्यव्यापी जनसन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी आरक्षण प्रश्नावरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
आरक्षणाचे भांडण मिटावं म्हणून सरकारने नुकतीच सह्याद्रीला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी येऊन मार्गदर्शन करावे, सगळं प्रकरण कसं शांत होईल. सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी येणे क्रमप्राप्त होते. मी विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा बोललो होतो. त्यांना सांगितलं की शरद पवार यांनासुद्धा बोलवा. एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी तिथे यायला हवं होतं. कारण व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. त्यांचे आभारसुद्धा मानले. परंतु, आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यावर साहेबांनी यावे, ही अपेक्षा होती. सगळे येणार होते; पण संध्याकाळी बारामतीमधून कोणाचा तरी फोन गेला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तुमचा राग अजित पवार, छगन भुजबळांवर असेल. पण, ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे. महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग सुरू आहेत. एकत्र बसून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, अशी सुबुद्धी सर्व विरोधी पक्षांना मिळो, असा टोला भुजबळ यांनी लगावला.
अजित पवार यांचे काैतुक
समाजातील विविध घटकांना एक लाख कोटी दिले जाणार आहेत. आम्ही सगळ्यांनी याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर टाकली आहे. ती ते पूर्ण करतील, याची आम्हाला खात्री आहे. ज्यांनी सुनेत्रा पवार यांना मतदान केलं त्यांनीसुद्धा अर्ज भरा, ज्यांनी सुप्रियाताई यांना मत केलं त्यांनी पण अर्ज भरा. सगळ्या अजित पवार यांच्या भगिनी आहेत. यामध्ये भेदाभेद करायचा नाही, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काैतुक केेले.