आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. ही खूपच चांगली गोष्ट झाली, की योगाला त्याचा जो आंतरराष्ट्रीय दर्जा आहे, त्याच्यावर मान्यतेची मोहोर उमटली. आयुर्वेद आणि योगाचा प्रसार गेल्या ४-५ दशकांमध्ये तसा झालेलाच होता. त्याला सर्व राष्ट्रांनी मान्यता देणे, त्यात भारताचा पुढाकार असणे ही महत्त्वाची आणि आनंदाची घटना आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असताना त्याला सणाचे स्वरूप प्राप्त होणे अपरिहार्य होते. त्यात काही गैर आहे, असे मात्र नाही. सण हे आनंदाचे प्रतीक असते. तो साजरा करणे योग्यच आहे; मात्र तो नैमित्तिक उत्सव न राहता नित्य उत्सव कसा होईल, याच्याकडे लक्ष दिले, तर योगाचे जे दीर्घकालीन परिणाम आहेत, ते आपल्याला सगळ्यांना मिळू शकतील. म्हणून हा सण साजरा करीत असताना अशी दृष्टी ठेवणे, की हा सण आजच्यापुरता करायचा नाही, तर आज करूम त्यातून प्रेरणा घेऊन निदान एक वर्ष करायचा आहे. मी असे म्हणेन, की आयुष्यभर करायचा आहे. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा योग दिन साजरा होईल, तेव्हा आपल्याबरोबर वेगळ्या प्रकारच्या अनुभवाची शिदोरी असेल. आपण नुसता साजरा करतो आहे, असे नाही तर योगविद्येचा आपण साधना करून अनुभव घेतलेला आहे.योगाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे त्याची मागणी खूप वाढली आहे. लोकांमध्ये योगाविषयी उत्सुकता निर्माण झाली. खूप वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट, डिप्लोमा, बीए, एमए, पी.एचडी. असे अभ्यासक्रम दिले जात आहेत. तेही काही गैर नाही. मागणी तसा पुरवठा होणे आवश्यक आहेच; मात्र योगविद्या थोडी वेगळ्या प्रकारची विद्या असल्यामुळे तिला अशा कुठल्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये बांधून ठेवणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न मला पडतो. माझ्याकडे येणाऱ्या लोकांकडे पाहताना मला असे आढळते, की काही जण बरीच वर्षे येणारे आहेत; पण योगाचे जे आंतरिक परिवर्तन होणे, दृष्टीचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हे परिणाम आहेत, ते वर्षानुवर्षे योग करणाऱ्यांमध्येही मला दिसत नाहीत. त्याच वेळेला असेही काही असतात, की थोड्या दिवसांसाठी आलेले असतात; पण इतके चांगल्या प्रकारे शिकतात, की ते वर्षानुवर्षे साधना करणाऱ्यांपेक्षा पुढे गेलेले असतात. त्यांच्या जीवनात तो आनंद, ती शांती, ते समाधान निर्माण झाल्याचे दिसते, की जे योगसाधनेचे खरे महत्त्वाचे रूप आहे. सहा महिन्यांत थोडेफार शिकल्याने योगाचा जो दीर्घकालीन आंतरिक परिणाम आहे, परिवर्तन या स्वरूपातला परिणाम आहे, तो होणार नाही. लोकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे, उत्साह निर्माण झाला आहे, शिकावेसे वाटत आहे, त्यांनी नीट काळजीपूर्वक पाहिले तर योगाभ्यासामुळे अनेक मानसिक, भावनिक, शारीरिक उपचार होऊ शकतात. अनेक रोगांचा प्रतिबंध होऊ शकतो. हे जरी खरे असले, तरी योगाचे जे खरे मूलभूत स्वरूप आहे, ते आंतरिक परिवर्तन हे आहे, ते दृष्टीआड करून चालणार नाही. योगाचे ज्ञान अनुभूतिजन्य ज्ञान आहे. ते केवळ माहितीपर ज्ञान नाही. ज्याच्यावर आपण चिंतन केले आहे, अनेक ग्रंथ वाचले आहेत, टिपणे काढली आहेत. असे करणे म्हणजे माहितीचे ज्ञानामध्ये रूपांतर झाले. योग म्हणजे फक्त माहिती नाही, फक्त ज्ञान नाही. ते अनुभूतिजन्य ज्ञान आहे, हे समजून घेतले पाहिजे.
योग दिन नैमित्तिक न राहता नित्य उत्सव व्हावा
By admin | Published: June 22, 2017 6:49 AM