पुणे : “पुरस्कारांनी सन्मानित होणारी विविध वाङमय प्रकारातील उत्तम पुस्तके जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोचण्यासाठी पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र प्रदर्शन असावे. ते भरविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा,” अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरावरून’ या डॉ. अमर अडके लिखित ग्रंथाच्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीबद्दल हा पुरस्कार अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूरचे अमेय जोशी यांना बनहट्टी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, ग्रंथनिवड समितीच्या सदस्य प्रा. रुपाली अवचरे उपस्थित होते.
बनहट्टी म्हणाले, ‘आशय हा कोणत्याही पुस्तकाचा आत्मा असतो, त्याला साजेशी पुस्तकनिर्मिती करणे यात प्रकाशकाची सर्जनशीलता दिसते.’ अध्यक्षीय भाषणात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, पुस्तक निर्मिती हा सामूहिक आविष्कार आहे. पुस्तक प्रकाशन-प्रक्रियेत लेखकाइतकेच मुद्रितशोधक, चित्रकार, बांधणीकार, छपाई करणारे यांचे योगदान महत्वाचे आहे.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ अमर अडके म्हणाले की, गिरिशिखरावर गेल्यानंतर आलेली अपूर्व अनुभूती शब्दांत मांडणे कठीण होते. या पुरस्कारामुळे सह्याद्रीच्या गिरिशिखरांशी स्नेहबंध जोडणाऱ्या सर्वांचा सन्मान झाला आहे. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.