..... म्हणून आम्हाला राजकीय पक्षांमध्ये घेण्याची स्पर्धा लागू नये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 07:33 PM2019-03-01T19:33:54+5:302019-03-01T19:34:33+5:30
तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो टिपिकल पुरुषी चेहरा आणि भडक मेकअप. पण आता त्याही पलीकडे जाऊन नागरिक आणि माणूस म्हणूनही त्यांना स्वीकारायला सुरुवात झाली आहे
नेहा सराफ
पुणे : तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो टिपिकल पुरुषी चेहरा आणि भडक मेकअप. पण आता त्याही पलीकडे जाऊन नागरिक आणि माणूस म्हणूनही त्यांना स्वीकारायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांची मतदार संख्येत आणि राजकीय क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.मात्र त्यांना स्वीकारण्याच्या आणि सामावून घेण्याच्या प्रयत्न राजकीय पक्षात घेण्याची स्पर्धा होऊ नये असे मत काही तृतीयपंथीयांनी व्यक्त केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. २०१४साली पुण्यात केवळ एका तृतीयपंथी व्यक्तीची मतदार म्हणून नोंद होती. यावेळी मात्र ही संख्या १३९ झाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार नोंदणी न होण्यामागे तृतीयपंथीयांची नकारात्मकता कारणीभूत नाही. अनेकांकडे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्र नसल्याने त्यांची इच्छा असूनही यादीत नाव नसल्याचे सांगितले जाते. शिवाय कर्नाटक,हैद्राबाद, महाराष्ट्राचा ग्रामीण भाग या भागातून अनेक तृतीयपंथी पुण्यात उदर्निवाहासाठी येत असल्याने त्यांच्याकडे इथला रहिवासी पुरावा नव्हता. पण सध्या आधार कार्डची सक्ती झाल्याने अनेकांनी स्वतःचे ओळखपत्र करून घेतले आणि त्याचाही फायदा मतदार नोंदणीत झाला.
एका बाजूला मतदार म्हणून वाढ होताना राजकीय पक्षही त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर तृतीयपंथी व्यक्तीची नेमणूक केल्यावर पुणे शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही तीच परंपरा सुरु ठेवली आहे.काँग्रेसने सोनाली दळवी यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसने शहर उपाध्यक्षा म्ह्णून चांदणी गोरे यांची निवड केली आहे.शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या म्हणून दिशा शेख काम करत आहेत. या सगळ्याजणी अतिशय आत्मविश्वासाने राजकीय विश्वात वावरताना दिसत आहेत.
रुपाली चाकणकर, महिला शहराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस :तृतीयपंथीयांना घेण्यामागे त्यांना सामावून घेण्याची इच्छा आहे. त्या महिलाही आपल्यातल्या आहेत आणि त्यांनाही समाजाने तितक्या सहजपणे स्वीकारावे अशी आमची भावना आहे. समाजसेवेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या चांदणी यांचा पक्षात कायम सन्मान होईल
सोनाली दळवी तृतीयपंथी आणि काँग्रेस सरचिटणीस :मला वाटत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलं म्ह्णून आता आम्हाला राजकीय पक्षात घेण्याची स्पर्धा लागू नये. आमच्या ३७७ कलमाच्या पाठिंब्यासाठी फक्त शशी थरूर आणि सुप्रिया सुळे पुढे आले, हेदेखील विसरून चालणार नाही. या माध्यमातून महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
चांदणी गोरे, तृतीयपंथी आणि राष्ट्रवादी उपाध्यक्षा :राजकारणाच्या आधी मी माझं समाजकार्य सुरु ठेवणार आहे. आजही कोणत्याही पदासाठी मी आसुसलेले नाही. या पदाचा आधार घेत महिला, लहान मुले आणि अर्थात तृतीयपंथीयांचे प्रश्न प्राधान्याने मांडेन. या बदलत्या ट्रेंडचं मी स्वागत करते.