कोरोनावर ‘लस’ हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील आणि आता दुस-या टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरच शरीरात आजाराशी लढा देणारी प्रतिजैविके तयार होणार आहेत. असे असताना देखील लसीकरणाबाबत अद्यापही अशिक्षित मंडळींसह काही सुशिक्षितांमध्येही अनेक प्रकारच्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा असल्याची धक्कादायक बाब पाहायला मिळत आहे.
राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते म्हणाले, गोसावी वस्तीमधल्या मराई समाजातील (पोतराज) माणसांचा देवावर अधिक विश्वास आहे. देवी त्यांच्या अंगात येते. देवीने सांगितल्यामुळे आम्ही लसीकरण करणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते लस घेत नाहीत. लस घेतली तर मृत्युमुखी पडू किंवा मुलं दगावतील अशी त्यांची मानसिकता आहे.
दुसरीकडे गोसावी समाजातील काही लोकांना लस घ्यायची इच्छा आहे पण भट्क्या विमुक्त जमातीतील लोकांकडे आधारकार्ड नाही, ना त्यांची शासनस्तरावर कोणती नोंदणी आहे. त्यामुळे त्यांना लस मिळणे अवघड झाले आहे. इतक्या वर्षात त्यांची शासनाने दखलच घेतलेली नाही.
---------------------------
भटक्या आणि विमुक्त समाजातील लोकांमध्ये अंधश्रद्धा असून, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आजपर्यंत कुठलीही लस घेतलेली नाही. आम्हाला काही झालेलं नाही. आम्ही केवळ अंगारा लावतो. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, असे सांगून कुणी घाबरत किंवा फसवत असेल, तर जादुटोणा विरोधी कायद्यानुसार तो गुन्हा आहे. मात्र या लोकांना कायदे माहिती नाहीत. गावाकडची अशिक्षित मंडळीं देखील लस घेतल्याने माणसं मरतात म्हणतात. आम्हाला आत्तापर्यंत झाला का कोरोना? मग आता काय होणार? अशी त्यांची धारणा आहे.
- नंदिनी जाधव, अंनिस, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष
------
लस घेणे का आवश्यक आहे?
कोणतीही लस ही आजाराचा प्रतिकार करण्यासाठी घेतली जाते. एखादा विषाणू शरीरात गेल्यानंतर त्याला निष्क्रीय करण्याचे काम लसीच्या माध्यमातून होते. विषाणूची रोग निर्माण करण्याची क्षमता काढून घेण्याचे काम ही लस करते. एकप्रकारे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी प्रतिजैविके तयार होतात. एखादा विषाणू जर शरीरात आला, तर त्याच्याविरूद्ध लढण्यासाठी पांढ-या पेशी सज्ज होतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर सौम्य ताप येणे, अशक्तपणा येणे अशा गोष्टी होऊ शकतात. काही दिवसानंतर जर रोग निर्माण करणा-या एखादया विषाणूने जर शरीरात प्रवेश केला तर त्याला प्रतिकार करण्याचे काम या पेशी करतात. कुणीही लस घेणार नाही असे म्हणत असेल तर जनजागृती करणे महत्वाचे आहे.
- डॉ. संजीव वावरे, महापालिका आरोग्य अधिकारी
------------------------