पोलिसांकडून कारवाई : सहा महिन्यांत ६९८ जणांवर गुन्हे
पुणे : साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या विरुद्ध कलम १८८ अन्वये अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. दुसऱ्या लाटेत १ एप्रिल ते २० जून दरम्यान पुणे पोलिसांनी ६९८ जणांवर या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी सुरुवातीला पोलिसांनी लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी केली होती. या काळात तब्बल २८ हजार ३०४ जणांवर १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच जवळपास २५ हजार दुचाकी, चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, डिसेंबरपासून या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शहरात मोठा गदारोळ झाला. तेव्हा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांवर दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यांत आता पुढील कारवाई करण्यात काही हशील नाही, असे सांगून नागरिकांना त्रास होणार नाही असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने हे गुन्हे मागे घेण्याची कारवाई केली.
पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत या लॉकडाऊनच्या काळात निर्बंध कमी होते. पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यावर अधिक भर दिला होता. दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
चौकट
काय आहे कलम १८८?
१८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू होतात. तसेच शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेश देऊ शकतात. या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. विशेष म्हणजे, कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे असेही नाही. नियम मोडला की ती व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरते.
चौकट
काय होऊ शकते शिक्षा?
या कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले तर आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर त्या व्यक्तीस ६ महिने कारावास किंवा १ हजार रुपये किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.
चौकट
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून शासनाने पुन्हा एकदा संचारबंदी लागू केली आहे. सायंकाळी ५ नंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने यापुढील काळात या संचारबंदीचा भंग केल्याने कलम १८८ खाली आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात.