माजी आमदार रविंद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे. शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धंगेकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्यामुळे चर्चेला हवा मिळाली. या सगळ्यांवर माजी आमदार धंगेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रविंद्र धंगेकर म्हणाले, "रिल टाकण्याचं माझ्या मनात होतं. शिवजयंतीचं वातावरण होतं आणि त्या वातावरणात फोटो चांगला होता. गळ्यात भगवा रुमाल होता. त्या फोटोवरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आणि वातावरण असं झालं की, मी शिवसेनेत चाललो आहे."
"भगव्या उपरण्यातच जन्म झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. मी मानवता कार्यकर्ता आहे", असे रविंद्र धंगेकर भगव्या रुमालावरून सुरू झालेल्या चर्चांबद्दल बोलताना म्हणाले.
उदय सामंतांच्या ऑफरवर धंगेकरांचं मत काय?
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी रविंद्र धंगेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्याबद्दल रविंद्र धंगेकर म्हणाले, "त्यांना वाटतं असेल की, आपला मित्र जवळ असला पाहिजे. कोणालाही तसं वाटतं. माझा स्वभाव चांगला आहे. त्यामुळे ऑफर देणं काही चुकीचे नाही."
कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर शिवसेनेत जाणार का?
तुम्ही शिवसेनेमध्ये जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर तुम्ही तसा विचार करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना धंगेकर म्हणाले, "मी गावी होतो. शनिवारी-रविवारी काही काम नसतं. आमदार असताना लोक भेटायला यायचे. काही लोकांचे विषय असतात, त्यांची कामे असतात. आता मला कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल. आता लय डोक्यावरून पाणी गेलं आहे. सोशल मीडियावर काहीही टाकतात."
"मी कार्यकर्त्यांशी बोलेन. माझ्या डोक्यात अजून काही नाही. पण, जाताना काही लपून जाणार नाही किंवा लपून येणार नाही. मला सगळ्यांशी बोलावं लागेल. मी कार्यकर्त्यांना आधीच सांगितलं आहे की, आपण आता कुठे जायला नको. आपण रस्त्यावर लढू", असे धंगेकर म्हणाले.