लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यापाठोपाठा ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी रेट अद्यापही खाली न आल्याने ग्रामीण भागातील निर्बंधात अजूनही शिथिलता आली नाही. मागील आठ दिवसांत हॉटस्पॉट गावांच्या संख्येत ४० ने घट झाली. वेल्हा तालुका ‘हॉटस्पॉटमुक्त' झाला. खेड आणि मावळ तालुक्यात हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याएवजी वाढ झाली आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक ४७ गावे हॉटस्पॉट आहेत. तर जुन्नर, आंबेगाव, मावळ, इंदापूर, शिरूर आणि बारामती या तालुक्यांमध्ये ३० पेक्षा अधिक हॉटस्पॉट संख्या आहे.
ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पॉझिटिव्हिटी दर हा जास्त होता. मात्र, यात हळूहळू घट होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्वाधिक ४६५ हॉटस्पॉट गावांची संख्या होती. दरम्यान, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये हॉटस्पॉट गावांची संख्या अधिक आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील शहरी भागातील बाधितांची संख्या कमी होऊ लागली. मात्र, ग्रामीण भागात बाधित संख्या वाढू लागली. त्यावर जिल्हा प्रशासनाने तत्काल उपाययोजना करत, हा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी सर्वेक्षण आणि नमुने तपासणीवर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे मागील महिन्याभरात १०८ हॉटस्पॉट गावे कमी झाली.
आठवडानिहाय आकडेवारी पाहिली, तर ५ मे रोजी ४२८ हॉटस्पॉट गावे होती. १९ मे रोजी ३९७ पर्यंत ही संख्या घटली. तर २६ मे रोजी म्हणजेच आठवडाभरात ४० ने हॉटस्पॉट गावे कमी झाली. त्यामध्ये वेल्हा तालुक्यात एकही हॉटस्पॉट गाव नाही. तर भोर आणि मुळशी तालुक्यात केवळ ६ हॉटस्पॉट गाव आहेत. आठ दिवसांपूर्वी खेड तालुक्यात ४० हॉटस्पॉट गावे होती, आज त्यामध्ये ७ ने वाढ झाली असून, ४७पर्यंत पोहोचली आहे. मावळ तालुक्यात २४ वरून ३७ वर हॉटस्पॉट गावांची संख्या पोहोचली.
चौकट
तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या (कंसात मागील आठवड्यातील संख्या)
खेड - ४७ (४०), बारामती - ४० (४८), शिरूर - ३८ (४२), इंदापूर - ३८(४१), मावळ - ३७ (२४), आंबेगाव - ३३(३५), जुन्नर - ३० (३६), दौंड - २८ (४४), पुरंदर - २८ (२८), हवेली - २६ (३६), भोर - १३ (६), मुळशी - ८(६), वेल्हा - ० (२)