उमेदवारी दाखल होण्यापूर्वी सत्यजित तांबेंशी चर्चा झाली नाही; अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:42 PM2023-02-05T15:42:51+5:302023-02-05T15:43:48+5:30
कोणताही निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक तुमची पुढील रणनीती आखा, अजित पवारांचा सत्यजित यांना सल्ला
बारामती : उमेदवारी दाखल करण्यापूर्वी आपण विरोधी पक्ष नेते अजित पवार व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली होती असे विधान नुकतेच सत्यजित तांबे यांनी केले होते. तांबे यांचा हा दावा खोडून काढत ‘माझी व सत्यजित यांची उमेदवारी दाखल करण्यापूर्वी कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, आज सकाळी त्यांचा फोन आला होता. मंगळवारी मी मुंबईमध्ये आहे शक्य असेल तर तिथे समक्ष बोलू असे त्यांना सांगितले आहे, अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती येथे शनिवारी (दि. ४) माध्यमांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले, सत्यजित यांना मी म्हणालो आहे, तुम्ही तरुण आहात, पुढचे उज्ज्वल भविष्य तुमच्यासमोर आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक तुमची पुढील रणनीती आखा. बाकीचे आपण समक्ष भेटल्यावर बोलू. यावेळी पवार यांना शिवसेना पक्ष संदर्भात सुरू असलेल्या निवडणूक चिन्ह वादाबाबत छेडले असता, कोणी जबाबदार व्यक्ती याबाबत बोलली तर मी त्याला उत्तर देईन. मात्र, कोणाही मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्ती याबाबत बरळत असतील तर त्याला उत्तर देण्याचे काय कारण? असा उलट प्रश्न त्यांनी केला. तसेच अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीच्या मतावर आम्ही आमचे मत व्यक्त करून आमचा वेळ का वाया घालवावा, असाही सवाल अजित पवार यांनी केला. तसेच पिंपरी चिंचवड व कसबा येथील विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू आहे. रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.