जुन्नर : कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चदेखील निघणे अवघड झाल्याने जुन्नर येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. १७) तहसील कचेरीसमोर ट्रॉलीभरून कांदा रस्त्यावर ओतून दिला. तसेच, नागरिकांना मोफत वाटला. शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे, नितीन विधाटे, उज्ज्वला पवार, गणेश शेळके, शांताराम डोंगरे, अविनाश खिलारी, मारुती डोके यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन वाटप करण्यात आले.
कांदा उत्पादक शेतकरी या वेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते. जुन्या साठविलेल्या कांद्याला सध्या ३० ते ६० रुपये प्रतिदहा किलोस दर मिळत असून, नवीन कांद्याला ३० ते ९० रुपयांपर्यंत मिळत आहे. कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने जुना साठवणूक केलेला कांदा आता शेतकºयांनी विक्रीसाठी बाहेर काढला आहे. राज्य शासनाने याबाबतगांभीर्याने विचार करून सर्व शेतीमालांना हमीभाव द्यावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. याप्रसंगी कांदा हमीभावासह इतर शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जुन्नरच्या तहसीलदारांना देण्यात आले. जुन्नर तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे असून कांद्याचे अडतदार सुमीत परदेशी यांनी सांगितले. साठविलेल्या कांद्याला सध्या ३० ते ६० रुपये प्रति दहा किलोस दर मिळत आहे.