शिरसगाव काटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ११ व्या मैल परिसरात बिबट्याने पशुवैद्यकीय डॉक्टरवर झडप घातली; परंतु गाडीच्या नायट्रोजन कंटेनरचे झाकण निघून धूर निघाल्याने बिबट्याने धूम ठोकली. यात डॉक्टर जखमी झाले. झोपेचे सोंग घेतलेल्या वन विभागाने आता तरी जागे व्हावे, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.सविस्तर हकिगत अशी की, पशुवैद्यकीय अधिकारी गोरख पांडुरंग सातकर हे सायंकाळी उशिरा येथील अकरावा मैल परिसरातील शेतकºयांच्या जनावरांची तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणी करून येत असताना एका उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप टाकली.या वेळी बिबट्यासह डॉक्टर अन् दुचाकी चार ते पाच फूट फरफटत खड्ड्यात गेली. यानंतर वाहनाला जोडलेल्या नायट्रोजन गॅसच्या टाकीचे झाकण उघडून धूर झाला. झालेला धूर पाहताच बिबट्याने तेथून धूम ठोकली. यानंतर घाबरलेल्या डॉक्टरांनी जवळच्या शेतक-यांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. घटनेची माहिती समजताच डॉक्टरांना उपचारांसाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी याच परिसरात एका शेतकºयावर अशाच पद्धतीने बिबट्याने झडप घातली होती. त्यातही शेतकरी सुदैवाने वाचला होता.शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी बोलताना सांगितले की, एका दिवसापूर्वी मांडवगण पोलीस चौकीच्या दोन कर्मचाºयांवरही अशीच वेळ आली होती. परंतु, त्या वेळी प्रसंगावधान राखल्याने कर्मचाºयांना कोणतीही इजा झाली नाही. रात्री-अपरात्री पोलिसांनी गस्त कशी घालायची, असा सवाल कुंटे यांनी केला. तर, कुरुळीजवळील शेतात बिबट्याच्या मादीची पिल्ले सापडली होती.याबाबत घोडगंगाचे संचालक सुधीर फराटे, नरेंद्र माने, संचालक विजेंद्र गद्रे यांनी शिरसगाव काटा, मांडवगण फराटा परिसरात बिबट्याच्या प्रतिबंधासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी केली आहे.या परिसरात अनेक कुत्रे, शेळ्या, जनावरेही बिबट्याने लक्ष्य केली होती. परंतु, आता माणसांवरच हल्ले होऊ लागले आहेत.
दुचाकीतून धूर निघाला अन् डॉक्टर बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:48 AM