बापू बैैलकर, पुणेजिल्ह्यातील गाळात रुतलेल्या तलावांना आता नवसंजीवनी मिळणार असून, शासनाच्या ‘जलयुक्त शिवार योजन’च्या माध्यमातून त्यांतील गाळ काढण्यात येणार आहे. तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार केला असून, त्याची कामे लवकरच सुरू होणार आहेत. यासाठी २ कोटी ५४ लाखांचा निधी दिला जाणार आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलसंधारणच्या माध्यमातून जलायश, मोठे व मध्यम स्वरूपाचे तलाव बांधण्यात आले आहेत. गळती व गाळामुळे या तलावांतील पाण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. काही तलाव तर गाळात रुतले आहेत. या तलावांतील गाळ काढण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला. मात्र, काही तलाव हे वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वन विभागाने त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे हे तलाव दिवसेंदिवस गाळात रुतल्याचे चित्र आहे. आता शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातू आता जिल्ह्यातील १८ तलावांतील गाळ काढण्याचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. यात पुरंदर तालुक्यातील पिलाणवाडी व नाझरे, बारामतीतील सुपे, इंदापूरमधील तरंगवाडी, खेडमधील कडूस व इंदिरा पाझर तलाव, आंबेगावमधील पोंदवाडी-खडकवाडी, दौंडमधील खोर यांसह १८ तलावांतील गाळ काढला जाणार आहे. २ कोटी ५४ लाखांचा निधी यासाठी दिला जाणार असून, प्रत्येक तलावासाठी साधारण २५ लाखांचा निधी मिळणार आहे. हे काम करून घेण्यासाठी प्रत्येक कामासाठी एका अधिकाऱ्याकडे पालकत्व दिले जाणार आहे.
नाझरेसह १८ तलाव होणार गाळमुक्त
By admin | Published: April 09, 2015 5:12 AM