भोर: पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे. बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वेल्हे येथे ३२, तर पानशेत येथे ३५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी आरोग्य प्रशासनाला केल्या आहेत. तसेच तत्काळ तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना संसर्ग वाढत असून आमदार संग्राम थोपटे यांनी वेल्हे तालुक्यातील कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे, पंचायत समिती रोहन बाठे, मुंबई बाजार समितीचे संचालक धनंजय वाडकर, तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर, ग्रामीण रुग्णालय वेल्ह्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.परमेश्वर हिरास, डॉ.शैलेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती दिनकरराव सरपाले, नाना राऊत, मालवली गावचे सरपंच हेमंत जाधव, विशाल राऊत आदी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी प्रयत्न केले होते. ते यशस्वीही झाले. आता दुसरी लाट आली आहे. तिची तीव्रता अधिक असून सर्वानी एकत्रितपणे काम केल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. वेल्हे येथील औद्यगिक प्रशिक्षण संस्थेत असणाऱ्या काेविड सेंटरमध्ये ३२ ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या ३० ऑक्सिजन असून त्यामध्ये आणखी पाच बेड वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर आमदार फंडातून ग्रामणी रुग्णालयासाठी रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील ससेवाडी येथील युनिव्हर्सल कॉलेज येथे कोविड केअर सेंटरला भेट दिली.या ठिकाणी सौम्य व मध्यम लक्षणं असलेल्या रूग्णांना उपचारासाठी ठेवले जाते. या काॅलेजमध्ये सुमारे १६० रुग्णांची क्षमता आहे. या ठिकाणी ५० अतिरिक्त ऑक्सिजन बेड करण्याचे ठरले असून त्यासाठी ग्रामपंचायत वेळू, सासेवाडी, शिंदेवाडी यांच्यासोबत जेजुरी देवस्थान यांनी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
दरम्यान भाटघर धरण खोऱ्यातील माजगांव-लव्हेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ३५ ऑक्सिजन बेड व एक ऑक्सिजन मशीन तयार करण्याचे ठरले असून उपजिल्हा रुग्णालय भोर येथेही एक मशीन बसविण्यात येईल त्याची किंमत अंदाजे ३८ लाख रुपये आहे. भविष्यातही अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर राजगड ज्ञानपीठ संचालित छत्रपती संभाजीराजे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग सुमारे १५० बेड्स कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध असल्याचेही आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.