राजू इनामदार- पुणे : शहराचा चेहरा बदलणाऱ्या मेट्रोच्या ५ किलोमीटरच्या भुयारी बोगद्यात जमिनीच्या खाली २८ मीटर खोलीवर ५ स्थानके असतील. या दुमजली स्थानकांची लांबी १५० मीटरपेक्षा जास्त असून रुंदी २५ मीटर आहे. डिसेंबरअखेर बोगदा खोदण्याचे काम सुरू होणार असून ते पूर्ण होण्यास किमान २ वर्षे लागणार आहेत. पुण्यात प्रथमच इतक्या खोलवर सलगपणे इतके खोदकाम होत असून शहराच्या मध्यभागातून जाणारा बोगदा पुण्याची एक वेगळी ओळख देणारा ठरणार आहे. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या ३१ किलोमीटरच्या मार्गापैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भाग पूर्ण भुयारी मार्ग आहे. जमिनीखाली २८ मीटर खोलीतून हा मार्ग जातो. त्यासाठी किमान ३० मीटर तरी खोदकाम करावे लागणार आहे. ५ किलोमीटर अंतराच्या सिमेंटच्या दोन मोठ्या ट्यूबच यातून जमिनीखाली तयार होणार असून त्यातून जाणारी व येणारी अशा दोन मेट्रो धावतील. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे या ५ किलोमीटरच्या अंतरात जमिनीखालीच ५ मेट्रो स्थानके असतील.
................ * शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट अशी ५ स्थानके भुयारात असणार आहेत. ती सर्व दुमजली असतील. दोन बोगद्यांच्या मधल्या जागेत ही स्थानके असणार आहेत.
* दोन्ही बाजूंनी त्यावर प्रवेश असेल. प्रत्येक स्थानकाची लांबी वेगवेगळी आहे. शिवाजीनगर व स्वारगेट ही स्थानके अनुक्रमे १७५ व १८० मीटर असतील. सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ व मंडई ही तीन स्थानके प्रत्येकी १५० मीटर लांबीची आहेत.
* सर्व स्थानकांची रुंदी २५ मीटर आहे. त्याचा पहिला मजला म्हणजे फलाट (प्लॅटफॉर्म) असेल. दुसºया मजल्यावर तिकीट विक्रीची व्यवस्था व प्रतीक्षा कक्ष वगैरे असेल. त्याच्या वर आले की प्रवासी थेट जमिनीवर येतील व रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून जातील.
* अशी असतील भुयारी स्थानकेस्थानकाच्या खालील मजल्यावरून म्हणजे फलाटावरून जमिनीवर येण्यासाठी पायऱ्या, सरकते जिने व लिफ्ट अशा सुविधा असतील. ही स्थानकेही उन्नत मार्गावरील स्थानकांप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण रचनेची, अत्याधुनिक बांधकामाची व सगळ्या आवश्यक सेवासुविधा असलेली असतील. प्रवासी जमिनीवर येतील त्या ठिकाणी किमान १५ ते २० मीटर रुंदीची जागा असेल. पाचही ठिकाणी अशी जागा निश्चित करण्यात आली आहे. शिवाजीनगरला एसटी स्थानकाच्या जागेत, सिव्हिल कोर्टजवळ, मंडईत झुणका भाकर केंद्राच्या जागेवर कामही सुरू करण्यात आले आहे. कसबा पेठेतील फडके हौदाजवळ जागा मिळण्यात काही अडचणी येत होत्या, त्यामुळे महामेट्रो कंपनीने ती जागाच बदलून त्यामागे असणाºया महापालिकेच्या दादोजी कोंडदेव या शाळेची जागा पालिकेकडून मिळवली आहे. तिथे कामही सुरू करण्यात आले असून कृषी महाविद्यालय व स्वारगेट या दोन्ही बाजूंना खोदकाम करणारे यंत्र (टीबीएम-टनेल बोअरिंग मशिन) जमिनीत सोडण्यासाठी म्हणून मोठा शाफ्ट (उतार) तयार करण्यात आला आहे. अशी चार यंत्र आहेत, त्यातील पहिले यंत्र येत्या काही दिवसांत पुण्यात सुट्या भागांच्या स्वरूपात दाखल होईल. ते जोडून डिसेंबरअखेर खोदकामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे. रोज साधारण ८ मीटर खोदकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भुयाराचे काम सुरू झाल्यापासून ते पुर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम पुर्ण होऊन ती दोन्ही बाजूंनी भूयारापर्यंत सुरूही करण्यात येईल. ......