पौड : मुळशी तालुक्यातील कोरोना रुग्णासाठी बावधन येथे ४०, तर पौड ग्रामीण रुग्णालयात असे एकूण ७६ ऑक्सिजन बेड जलद गतीने तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे व प्रांतधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आमदार संग्राम थोपटे यांनी आज पौड येथील तहसीलदार कार्यालयामध्ये घेतला. यावेळी मावळ मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, दादाराम मांडेकर, मधुर दाभाडे, सरपंच समीर सातपुते उपस्थित होते. आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, पौड व बावधन या ठिकाणी ७६ बेड होत असून या दोन्ही ठिकाणी मेडिकल ऑफिसर व नर्सची व्यवस्था केली जाईल. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मावळ - मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के म्हणाले की , १०० ऑक्सिजन बेडची जागा एकाच ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने पौड येथे ३६ आणि बावधन येथे ४० असे मिळून ७६ बेडचे कोरोना केंद्र तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी आठवड्यातून सहा तास खासगी डॉक्टर सेवा देतील. तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले की, पौड ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या प्रसूती या माण व माले येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात करण्यात येतील. तसेच पौड येथे होणारे शवविच्छेदन व दररोजचे रुग्ण तपासणी यापुढेही तशीच सुरू राहिल.
फोटो : पौड येथील ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करताना आमदार थोपटे व समवेत प्रशासकीय अधिकारी.
फोटो - मुळशी सेंटर