दारूबंदीसाठी कुरुळीच्या सरपंच शहनाज आरीफ पठाण, उपसरपंच श्याम हरिहर, सदस्या प्रतिभा बोरकर, मनिषा खांडेकर, रत्नप्रभा घोरपडे, सीमा बोरकर, ज्योती बोरकर, पोलीस पाटील नामदेव घोरपडे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय आमराळे यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील पदाधिकाऱ्यांनी दारूबंदी संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे नुकतीच भेट घेत, गावातील दारूबंदीच्या विषयांवर चर्चा केली. यावेळी दारूबंदी संदर्भात लागेल ती सर्व मदत आपणास केली जाईल, असे हजारे यांनी सांगितले.
तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे धंदे सुरू असून, अनेकांचे संसार या दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. या दारूच्या धंद्यामुळे अनेक कुटुंबांत मोठ्या प्रमाणात घरगुती वाद होत आहेत. पोलीस प्रशासनही काही प्रमाणात दारूधंद्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले असून, दारूबंदी करण्यासंदर्भात शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावे, असे कुरुळीच्या सरपंच शहनाज पठाण यांनी सांगितले. दारूबंदी करण्यासंदर्भात पुढील काही दिवसांत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची भेट घेऊन दारूबाबत कठोर पावले उचलली जाणार असल्याचे उपसरपंच श्याम हरिहर यांनी सांगितले.