पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोडसाठी पश्चिम भागातील ३५ गावांचे तर पूर्वमधील ४९ गावांचे भूसंपादन करण्याचे नियोजन असून आतापर्यंत एकूण ७२१ हेक्टर क्षेत्रापैकी २०५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झाले आहे. पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी ऐच्छिक जमीन देण्यास विरोध केल्याने ३१ गावांमधील सुमारे ४११ हेक्टर क्षेत्राचे सक्तीचे भूसंपादन होणार आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत २०५ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांचे वाटप केले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला १ हजार ३५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी १ हजार २१ कोटी रुपयांचे वाटप केले. त्यानंतर ६३६ कोटी रुपये आणखी देण्यात आले. त्यात मावळ तालुक्यासाठी दोनशे कोटी, हवेलीसाठी चारशे कोटी रुपये तसेच भोर तालुक्यासाठी ३६ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यापैकी हवेली तालुक्यात ५० कोटी, तर मावळ तालुक्याने २०० कोटींचे असे एकूण सुमारे १३०० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.
जिल्हा दर समितीच्या बैठकीत पश्चिम भागातील ३१ तर पूर्व भागातील ४ गावांचे सक्तीने भूसंपादन करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी भूसंपादनाचे निवाडे जाही करण्यात येणार आहेत. यात ५१६ हेक्टर भूसंपादन प्रस्तावित आहे. त्यापैकी पूर्व भागातील १०५ हेक्टर तर पश्चिम भागातील ३१ गावांमधील ४११ हेक्टर क्षेत्र आहे. यातील २०५ हेक्टर क्षेत्राचे संपादन ३१ गावांमधून करण्यात आले आहे. बहुतांश गावांतील सरसकट क्षेत्राचे भूसंपादन झालेले नाही. त्यातील काही गटांतील क्षेत्र प्राप्त झाले असून उर्वरीत क्षेत्र संपादित करायचे आहे. त्यामुळे ३१ गावांतील ४११ हेक्टर क्षेत्राचे सक्तीने भूसंपादन होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संपादित क्षेत्र करण्यात येणारी गावे
मुळशी –(१३ गावे) जवळ, केमसेवाडी, अंबडवेट, पिंपवली, पडघळवाडी, रिहे, मातेवाडी, घोटावडे, उरावडे, मारणेवाडी, आंबेगाव, मुठा, कातवडी.मावळ –( ६ गावे) उर्से, परंदवाडी, बेबळ ओव्हळ, धामणे, चांदखेड, पाचाणेहवेली – (१० गावे) थोपटेवाडी, मांडवी बु. मोरदरवाडी, खामगाव, मावळ, वडदरे, मालखेड, सांगरून, भगतवाडी, कल्याण, रहाटवडे, बहुलीभोर- (२ गावे) कुसगाव, रांजे