पिंपरी : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत एका उमेदवाराला एका प्रभागातील एकाच जागेवर निवडणूक लढविता येणार आहे. उमेदवाराने एकाच प्रभागातील एकापेक्षा अधिक जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास छाननीत त्याच्याकडून कोणत्या जागेची निवडणूक लढवायची आहे, याविषयी लिहून घेतले जाणार आहे.महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. मुंबई वगळता इतर नऊ महापालिकांच्या निवडणुका बहुसदरुस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. मतदारांना चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मतपत्रिकेचा नमुना, मतपत्रिकेचा रंग, प्रभागातील जागांना क्रमांक देणे, उमेदवारी अर्ज सादर करणे याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसारच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. निवडणुकांसाठी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक सदस्यपदाच्या जागेला अ, ब, क, ड आणि ई अशा रीतीने क्रमांक देण्यात येतील. म्हणजेच १अ, १ब, १क आणि १ड अशी रचना करण्यात येणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक जागेसाठी वेगेवगळे उमेदवारी अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे. एका जागेसाठी एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज स्विकारले जातील. एकाच जागेसाठी उमेदवारी अर्ज स्विकारताना अनामत रक्कम एकदाच स्विकारली जाणार आहे. बहुसदस्यीय प्रभागपद्धतीमध्ये मतदान यंत्रावर लावण्यात येणाऱ्या विविध जागेच्या मतपत्रिका मतदारांच्या चटकन लक्षात याव्यात, यासाठी प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका निश्चित केल्या आहेत. अ जागेच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा, ब जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, क जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा, ड जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा तर इ जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा असणार आहे. उमेदवाराचे नाव आणि चिन्हाबरोबरच नोटाचाही समावेश मतपत्रिकेवर असेल. मात्र, उमेदवाराचे छायाचित्र यंदाच्या मतपत्रिकेवर नसेल. (प्रतिनिधी)उमेदवाराचे छायाचित्र मतपत्रिकेवर नसणारअ जागेच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा, ब जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, क जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा, ड जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा तर इ जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा असणार आहे. उमेदवाराचे नाव आणि चिन्हाबरोबरच नोटाचाही समावेश मतपत्रिकेवर असेल. मात्र, उमेदवाराचे छायाचित्र यंदाच्या मतपत्रिकेवर नसेल, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.