पुणे - बारामती शहरात नगरपरीषदेच्या सेवा रस्त्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजप नेते प्रशांत सातव , एका वकील यांच्यासह गुरुवारी(दि१४) अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या न्यायालयीन कामासाठी त्यांना शुक्रवारी (दि १५) न्यायालयात हजर करण्यात आलेहोते. यावेळी व्हीडीओ शुटींग करण्यावरुन पोलीस आणि वकील यांच्यात वाद झाला. यावेळी पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर त्याचेपर्यावसन हाणामारीमध्ये झाले. मात्र, सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्यात आले.
शुक्रवारी(दि १५) दुपारी १२.३० च्या सुमारास सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात आरोपी न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी एका पोलिस कर्मचाºयाकडुन शुटींग केले जात होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात व्हिडीओ शुटींग करण्यावर काही वकीलांनी आक्षेप घेतला. त्यानंतर या प्रकरणाची सुरुवात झाली. या नंतर पोलिस व वकीलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी वाद वाढल्याने वातावरण तणावपुर्ण झाले. याच तणावात शाब्दीक वादाचे न्यायालयाच्या आवारातच हाणामारीमध्ये रुपांतर झाले. पोलीस आणि काही वकीलांमध्ये यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचीदेखील शहरात चर्चा होती. या प्रकरणात अनेक वकीलांना मात्र पोलिसांच्या काठ्यांचा मार बसला. तसेच, एका वकीलाच्या कानालाही यामध्ये जखम झाल्याचे समजते. या घटनेची माहिती शहरात वाऱ्याप्रमाणे पसरली. त्यानंतर न्यायालय परीसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी काही वकीलांना पोलिसांनी ताब्यात घेवुन शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी व ज्येष्ठ वकील यांनी आपसात चर्चा केली. विविध मुद्दयांवर चर्चा करुन हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले. याप्रकरणी पोलिस व वकील यांच्यात काही दिवसानंतर संयुक्त बैठक घेण्याचेही ठरल्याची माहिती पुढे येत आहे. चर्चेतुन प्रकरण मिटविल्याने याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.