पुणे : सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचा पेहराव करून पुण्यातील एका जोडप्याने प्री वेडिंग फोटोशूट केले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या दोघांनी २४ डिसेंबरला पुण्यात संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून व अनोख्या पद्धतीने साध्या पेहरावात रजिस्टर पध्दतीने लग्न केले.
श्वेता पाटील आणि मंगेश लोहार यांची भेट साने गुरुजी कर्मभूमी प्रतिष्ठान या संस्थेत झाली. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या विचारांना मानणारे आहेत. जेव्हा लग्नाचा विचार सुरू झाला तेव्हा या आदर्श जोडप्याचा पेहराव करून प्री वेडिंगचे फोटो काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुण्यातील विविध भागांमध्ये जाऊन त्यांनी सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या पेहरावात फोटो काढले.
"चळवळीत काम करताना सावित्रीबाई आणि जोतिबा यांची जोडी नेहमीच प्रेरणादायी होती. आपण सुद्धा यांच्यासारखं प्रेम करावं असं वाटायचं. त्यांनी नेहमीच एकमेकांना आधार दिला. त्यामुळे जेव्हा आम्ही प्री वेडिंग फोटोशूट करायचा निर्णय घेतला तेव्हा या दोघांचा पेहराव करायचं ठरवलं." असं श्वेता सांगते.
श्वेता आणि मंगेश यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यांचं आंतरजातीय लग्न होतं. लग्नावेळी त्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.
"समाज अधिक चांगला होण्यासाठी जात, धर्म सोडून प्रेम करायला हवं. असं प्रेम आपण संविधानाच्या भरवशव्यावर करू शकतो, म्हणून आम्ही आमच्या लग्नावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले."असंही श्वेता सांगते.
मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न करण्याबाबत मंगेश म्हणतो, "लग्नात होणार खर्च करावा असं वाटलं नाही. त्यामुळे आम्ही तो खर्च न करण्याचे ठरवले. आपल्याकडे थाटामाटात लग्न करण्याची मानसिकता दिसते. एका लग्नामुळे आई वडिलांवर कर्जाचे ओझे होते. 2 - 3 दिवसांच्या आनंदासाठी आपण कर्जाचा डोंगर आई वडिलांवर टाकत असतो. हे सर्व आम्ही टाळायचं ठरवलं."