पुणे : वेळ सकाळी ९.३० वाजता...महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला भेट देण्याची इच्छा व्यक्त करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला...अनेक वर्षांपासून त्यांची संस्थेला भेट देण्याची इच्छा होती. परंतु या भेटीला मुहूर्त लागत नव्हता..अखेर शुक्रवारी हा योग जुळून आला.तब्बल दोन तास त्यांनी संस्थेमध्ये घालवून संस्थेचे प्रकल्प..विविध उपक्रम विशेषतः मराठी भाषेचा उगम कसा झाला? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. राज ठाकरे यांची ही भेट पूर्णतः अनौपचारिक होती. शुक्रवारी सकाळी ते मुंबईहून पुण्याला निघाले होते. तेव्हा त्यांनी अनिल शिदोरे यांना भांडारकर संस्थेला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे ते पहिल्यांदाच संस्थेमध्ये आले. यापूर्वी जेव्हा भांडारकरवर २००४ मध्ये हल्ला झाला होता तेव्हा राज ठाकरे यांनी संस्थेतील विद्वानांना सहकार्य केले होते, असे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी ' लोकमत' ला सांगितले.
या भेटीदरम्यान संस्थेचे कामकाज कसे चालते हे त्यांनी जाणून घेतले. याशिवाय मराठी भाषेचा उगम तसेच संस्कृत, तामीळ सारख्या भाषांशी तिचा असलेला संबंध याविषयी त्यांनी तज्ञांशी चर्चा केली. संस्थेची जुनी, दुर्मिळ हस्तलिखिते त्यांनी न्याहाळली. भांडारकर संस्थेच्या सुंदर आणि विस्तीर्ण परिसरात एक प्राचीन वटवृक्ष दिमाखात उभा आहे. या परिसरात खुला रंगमंच आकाराला येत आहे..त्या ज्ञानवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याची माहिती जाणून घेतली..या विस्तीर्ण वृक्षाच्या छायेत छायाचित्र काढण्याचा मोह देखील त्यांना आवरता आला नाही. यावेळी संशोधक केदार फाळके यांचे ' संभाजी महाराजांची राजनीती' हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले असल्याचे डॉ पटवर्धन यांनी सांगितले.........