जगातील बहुतांश वस्तू या उजव्या हाताच्या लोकांचा विचार करुन तयार केलेल्या असतात. या वस्तू वापरताना डावखुऱ्या लोकांची खूप अडचण होते. विशेषत: कात्रीचा वापर करताना जास्त त्रास होतो. भूमितीय उपकरणे, पेन हातात धरतानाही कसरत करावी लागते. त्याचमुळे बाजारपेठेमध्ये डावखु-या लोकांना वापरता येतील, अशी कात्रीचे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत. कात्रीला डावखुऱ्या लोकांकडून जास्त मागणी असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, गिटारसारखी वाद्ये, हातमोजे, कॉम्प्युटरचा माऊस, शिवणकामाच्या सुया अशा विविध वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
असोसिएशन फॉर लेफ्ट हँडर्सच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी ‘द लेफ्ट हँड शॉप’ सुरू करण्यात आले. येथे सुरी, कात्री, पत्ते अशा वस्तू उपलब्ध आहेत. बिपीनचंद्र चौघुुले आणि उदय पेंडसे या दोघांनी मिळून १९९१ रोजी या संघटनेची स्थापना केली. आज देशातीलच नव्हे, तर परदेशातील अनेक डावखुरे लोक या संघटनेचे सदस्य आहेत.
चौकट
“डावखुरेपणाविषयी जाणीव आणि जागरुकता निर्माण होण्यासाठी संघटनेची स्थापना केली. डावखुरेपणाच्या अंधश्रद्धांना आळा घालणे, हाही एक उद्देश आहे. आपल्या संस्थेच्या प्रेरणेतून श्रीलंका, इंडोनेशिया, झांबिया आदी देशांमध्येही अशा प्रकारच्या संघटना सुरु झाल्या. देश-परदेशातील हजारो लोक आणि अनेक सेलिब्रिटी सदस्य आहेत. ‘लेफ्ट हँडर्स डे’निमित्त शास्त्रज्ञ डॉ. क्लेअर कोरेक यांच्या संवादाचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.”
- बिपिनचंद्र चौघुले, संस्थापक, असोसिएशन फॉर लेफ्ट हँडर्स