पुणे :
* कर आकारणी व कर संकलन विभाग
पुणे महापालिका हद्दीत आपले गाव समाविष्ट झाले, आता आपल्याला अधिकचा मिळकतकर लागलीच सुरू होणार ही शंका या गावांमधील नागरिकांनी बाळगू नये़ मिळकतकर आकारणीबाबतचे १९९७ सालचेच धोरण २०१७ मध्ये व आत्ताही वापरले जाणार आहे़ त्यामुळे लागलीच मिळकतकराची वाढीव बिले न येता, येथील नागरिकांना पुढील पाच वर्षात टप्प्या-टप्प्याने म्हणजे दरवर्षी २० टक्के वाढ अशारितीने मिळकत कर वाढणार आहे़
पुणे महापालिकेच्या कारभाराचा मुख्य आर्थिक कणा हा कर आकारणी विभाग आहे़ त्यामुळे नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांचा विकास करताना या गावांमधून किती उत्पन्न मिळेल व ते याच भागात कसे खर्च करता येईल याचा ताळमेळ बांधण्याचे प्रशासनाचे नियोजन असते़ त्या पार्श्वभूमीवर कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली़
कानडे म्हणाले, सन २०१७ मध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांचा अनुभव पाठिशी असल्याने, या गावांमधील कर आकारणी करण्याचे काम सोपे जाईल़ ग्रामपंचायतीचा कर व महापालिकेचा कर यात जमिन आसमानाचा फरक असल्याने नागरिक मिळकत कर भरत नाही असे सरसकट म्हणणे रास्त नाही़ २०१७ साली महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधून सन १९-२० मध्ये पालिकेला ९३ कोटी रूपयांचा मिळकतकर मिळाला असून, २०१७ पासून २०६ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत़
आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसताना मिळकत कर जास्त का ही समाविष्ट गावांमधील नागरिकांची मागणी रास्त आहे़ पण गावांमध्ये केवळ सर्वसाधारण कर असतो तर महापालिका हद्दीत अग्निशामक, पाणीपुरवठा, रस्ते आदींसारखे ९ कर व राज्य शासनाचे रोजगार हमी, शिक्षण व मोठा निवासी असे ३ कर असतात़ परंतु, महापालिका समाविष्ट गावांमध्ये कधीच लागलीच १०० टक्के कर आकारणी करीत नसल्याचे कानडे यांनी सांगितले़
----------------------