पुणे : रानडे इन्स्टिट्यूटला मोठा ऐतिहासिक वारसा असून हा मोठा ठेवा जपला पाहिजे. त्यामुळे या जागेचा वापर केवळ शैक्षणिक वापरासाठीच केला जाईल. येथे कोणतेही व्यावसायिक बांधकाम केले जाणार नाही. रानडे इन्स्टिट्यूटमधील कोणतेही अभ्यासक्रम स्थलांतरित केले जाणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केली. तसेच यासंदर्भातील सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये विलीन करून काही अभ्यासक्रम स्थलांतरित निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये घेतला होता. मात्र, या निर्णयाला सर्वच क्षेत्रातून विरोध झाल्याने तो निर्णय मागे घेतला. परंतु, शनिवारी प्रत्यक्ष उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिट्यूटला भेट दिली. तसेच याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी पदाधिका-यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.
सामंत म्हणाले, रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेसंदर्भातील वाद न्यायालयात आहे. त्यामुळे सर्वप्रथम ही जागा विद्यापीठाच्या नावावर व्हावी, यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून विद्यापीठाला आवश्यक सहकार्य केले जाईल. येथील पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढील तीन महिन्यात रस्तोगी अहवाल देतील. त्यासाठी रस्तोगी विद्यापीठाच्या पदाधिका-यांशी चर्चा करतील. तसेच प्राध्यापक भरतीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच वित्त विभागाबरोबर चर्चा करून भरतीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.
महाविद्यालयाच्या शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला त्याची अंलबजावणी सुरू झाली आहे. खासगी विना अनुदानित महाविद्यालयांचे शुल्क कमी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाने वाढविलेल्या शुल्काबाबत काही विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली असून पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक तत्काळ फर्ग्युसन भेट देऊन शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांवर होणा-या अन्यायाबाबत प्राचार्यांशी चर्चा करतील, असेही सामंत म्हणाले.
------------
राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्स आणि आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर मांडला जाईल. त्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.