लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती: महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही. कोणत्या पातळीवर कोणती चर्चा चालते याला महत्व नसून, महाविकास आघाडीचेशरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे प्रमुख एका विचाराने चालतात. त्यामुळे कुठेही बिघाडी होणार नाही, असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे. गोविंदबाग निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्र पवार आरोग्यरथाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून अनेक जागांवर दावा केला जातोय. यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना लंके यांनी हा विश्वास व्यक्त केला. लंके पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधील सर्व जागा निवडूण आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख जे निर्णय घेतील. या चर्चांना महत्त्व असल्याचे यावेळी लंके म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेलेले आमदार पुन्हा शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले की, हा विषय वरिष्ठ पातळीवरील आहे. या विषयावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नसल्याचे लंके म्हणाले.माजी खासदार (सुजय विखे पाटील) यांच्याशी कधी भेट होते का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ! लंके म्हणाले की, राजकीय जीवनामध्ये माजी आणि त्यांची भेट झाली नाही. आणि या पुढील कालखंडातही होणार नाही. निलेश लंके ज्याच्या विरोधात निवडणूक लढवतो त्याच्याशी कधीही हात मिळवणी करत नसल्याचे लंके यांनी यावेळी सांगितले.