लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या उजनीच्या पाण्यावरून राजकारण सुरू आहे. पण इंदापूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री व जलसधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिले.
उजनी धरणातील पाण्यावरून सोमवारी (दि. १०) सिंचन भवन येथे बैठक झाली व बैठकीत गोंधळ झाला. उजनी धरणामधून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २३ गावांना देण्यास मान्यता दिली आहे. याच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी एकत्र आले असून, त्यांनी उजनी बचाव समिती स्थापन केली आहे. या समितीने इंदापूर तालुक्यास पाणी देण्यास विरोध केला आहे. याबाबत सोमवारी सिंचन भवन येथे या समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच इंदापूर तालुक्यातील शेतकरी यांची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उजनी बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्याचे नेते प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर भरणे म्हणाले, उजनीमधील मूळ पाण्याला कोणताही धक्का लावला जाणार नाही. मात्र, इंदापूर तालुक्याला मिळणाऱ्या पाण्याबाबत काही जणांचा गैरसमज झाला आहे, तो दूर करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. उजनी बचाव समितीमधील पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले आहे. मात्र, पुणे शहराची पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे खडकवासला धरणामधून इंदापूर तालुक्यास योग्य तेवढे पाणी मिळत नाही. इंदापूर तालुका हा टेलला आहे, त्यामुळे कायमच पाण्याची कमतरता असते. त्यासाठी केवळ पुण्यातून येणाऱ्या सांडव्यातून हे पाणी उचलणार आहे. उजनीच्या मूळ पाण्याच्या वाटप धोरणात कोणताही बदल करता येत नाही. उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्याच्या अनेक योजना आहेत, मात्र या योजना निधीअभावी बऱ्याच वर्षांपासून पूर्ण झाल्या नाहीत. आता मात्र या योजना येत्या दहा महिन्यांत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच या योजनांच्या पूर्णत्वासाठी राज्य शासनाकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तर इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पाण्याबाबत दोन्ही भागांतील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
---
बैठकीत असा झाला गोंधळ
उजनी धरणातील पाणीप्रश्नावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे अधिकारी आणि तेथील स्थानिक शेतकरी यांच्यात बैठक झाली. मात्र, पाणी प्रश्नावर काही मुद्द्यांवर भरणे यांच्या समोरच सोलापूर आणि इंदापूर येथील शेतकऱ्यांची शाब्दिक चकमक झाली आहे. यामुळे बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.