पुणे : शहराची जुलैअखेरपर्यंतची गरज भागेल एवढे पाणी खडकवासला प्रकल्पात राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागासाठी रब्बीचे एक आवर्तनही देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे पुण्याच्या पाण्यात कपात किंवा वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून उन्हाळी आवर्तनाबाबत जलसंपदा विभाग निर्णय घेणार असल्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे.
बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, संजय जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, “यंदा जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांची चांगली स्थिती आहे. ग्रामीण भागात पाऊस कमी झाल्याने नीरा डावा, उजवा, खडकवासला चासकमान कालवा, कुकडी आणि घोड कालवा येथून पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन कसे असावे यावर चर्चा झाली. पुणे शहरासाठीचे खडकवासला धरणातील पिण्यासाठी आवश्यक पाणी जुलै अखेरपर्यंत शिल्लक ठेवून उर्वरीत पाण्याचे रब्बीच्या पिकांसाठी नियोजन करायचे आहे. केवळ वीर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे तेथे काटकसर करावे लागेल.” पवना धरण पूर्ण भरले असल्याने पिंपरी चिंचवडला पिण्याच्या पाण्यासाठी काही अडचण येणार नाही. उपलब्ध पाण्याचा शक्य तेथे काटकसर करणे गरजेचे आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभाग एकत्र बसून पाण्याबाबत काय मार्ग काढता येईल यासाठी सात दिवसांची मुदत पालिका आयुक्तांनी मागितली आहे. पुढील आठवड्यात त्याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
चक्रीवादळामुळे पाऊस पडेल?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात दोन चक्रीवादळे निर्माण झाली असून. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर त्याचा फायदा होऊ शकतो. या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली तर जानेवारी- फेब्रुवारीत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
वाढीव कोट्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे-
पुण्याच्या महापालिका आयुक्तांनी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, “पुणे महापालिकेने राज्य सरकारच्या जलसंपदा खात्याकडे याबाबत मागणी केली आहे. त्याबाबत जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो प्रस्ताव गेला असेल. त्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.”