पुणे - लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या घोरपडी येथील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ मधील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि लष्करप्रमुख जनरल एम.एन. नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडला. या नामकरणाबद्दल टोकियो ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राने आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते आज ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ मधील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्रा हे नाव देण्यात आले. यावेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे व दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित होते. या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या सोळा खेळाडूंचा गौरव संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरवही करण्या आला. तसेच, सुभेदार नीरज चोप्राचाही विशेष गौरव करण्यात आला.
‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये हे स्टेडियम २००६ साली उभारण्यात आले. या स्टेडियममध्ये ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा सुभेदार असलेल्या नीरज चोप्राने या संस्थेत भालाफेकीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवार्थ या संस्थेतील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ आता ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम, पुणे कँटोन्मेंट’ म्हणून ओळखले जाणार आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण ‘ॲथलेटिक्स’ना या नावातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.
भारत आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो
आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभुषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात व्यक्त केला. पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते.