इंदापूर : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी सलग सात दिवस बारामती तालुक्याप्रमाणे अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यासाठी, प्रशासन व विविध राजकीय सर्वपक्षीय बैठकीत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला आहे.
या वेळी आढावा बैठकीस बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई शेंडे, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, काँग्रेस पक्षाचे स्वप्नील सावंत, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत कोकाटे, इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जीवन माने उपस्थित होते.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीस, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना बोलवले होते. या वेळी या सर्व उपस्थितांची मते जाणून सलग सात दिवस कडक लॉकडाऊन करण्यासाठी ठाम विचार करण्यात आला. होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये, अत्यावश्यक वाहना व्यतिरिक्त इतर वाहने रस्त्यावर फिरणार नाहीत. यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी पूर्ण सहकार्य करायचे आहे. रोज भरणारी मंडई किराणा दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. सर्व मेडिकल दवाखाने मात्र या कालावधीत रुग्णांना सेवा देण्यासाठी सुरू राहणार आहेत. इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी तब्बल सात दिवस तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी, पूर्ण सहकार्य करावे. असे आवाहन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
तालुक्यात शनिवारी २३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण
इंदापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात शनिवार ( दि. ८ ) रोजी ग्रामीण भागात २१३ व शहरी भागात २२ असे एकूण २३५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण ३३२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. सध्या तालुक्यातील २२३९ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर शनिवारी ५ कोरोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती तहसिलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.
०८ इंदापूर बैठक
इंदापूर येथे सर्वपक्षीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व इतर.