पुणे : पुणेकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे. घरात बसून कुटुंबियांसमवेत नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांना केले आहे. नववर्ष स्वागतासाठी शहरातील महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कनसह वेगवेगळ्या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी ५ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी दिली.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष स्वागतासाठी दरवर्षी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, डेक्कन परिसरासह शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठी गर्दी होते. यंदा नववर्ष स्वागतावर करोनाचे सावट आहे. रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी केले.
नववर्ष स्वागतासाठी उपहारगृहे, मद्यालयात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती. यंदाच्या वर्षी रात्री अकरापूर्वीच उपहारगृहे आणि मद्याालये बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी बाँब शोधक नाशक पथक (बीडीडीएस), साध्या वेशातील पोलिसांचे पथक तैनात राहणार आहेत.
वाहतूक नियोजनासाठी बंदोबस्तमहत्वाच्या ठिकाणी तसेच मार्गावर होणारी वाहनांची गर्दी होती. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
-----
यंदाच्या वर्षी नववर्ष स्वागतावर करोनाचे सावट आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे. शक्यतो नागरिकांनी यंदा घरातच नववर्ष साजरे करावे. हुल्लडबाजी केल्यास कारवाई करण्यात येईल.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे