नीरा/ वाल्हे : नीरा आणि वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीस्थळ कायमस्वरूपी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठीच येथील स्थानिक आणि वारकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या आहेत. यावर लवकच कार्यवाही होईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
पुरंदरमधील पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणच्या अडचणी व नवीन विकासकामांच्या संदर्भात बुधवारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी दौरा केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे, दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रुपाली सरनोबत, जिल्हा नियोजन आधिकारी संजय मरकळे, सहाय्यक आधिकारी किरण इंदलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, वाल्हेचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, संदेश पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकासातून पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामे लवकरच मार्गी लागतील. तीर्थस्थळांच्या दृष्टीने या परिसरात लोकांना सोय-सुविधा पुरवणे गरजेचे आहे. नीरा आणि वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीस्थळ कायमस्वरूपी विकसित करण्याच्या दृष्टीने स्थानिक व वारकऱ्यांचा काय मागण्या आहेत व काय उपाय योजना करता येतील हे जाणून घेत, पायी पालखी सोहळा जरी रद्द झाला असला, तरी पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणच्या अडचणी व नवीन विकासकामांच्या संदर्भात माहिती घेतली आहे. यावर लवकरच कार्यवाही होईल.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना नियम हा परवणीचा शब्द झाला पाहिजे. गेली दोन दिवस जरी पुरंदर तालुका कोरोना लस उपलब्ध नसली, तरी जिल्ह्यात मागील दोन दिवसांत विक्रमी संख्येने लसीकरण झाले आहे. एकाच दिवशी १ लाख ४० हजार लोकांना लिस दिली आहे. जिल्हाभरात दोन्ही महानगरपालिका व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६३० पेक्षा अधिक लसीकरण केंद्र सुरू आहेत. एकाच दिवशी दीड लाख लोकांना लसी दिली जाऊ शकते, अशी सोय केली आहे, पण लस उपलब्ध होत नाही. त्या अनुषंगाने लसींचा पुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
३० नीरा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळावर वृक्षारोपण करताना राजेश देशमुख, संजय जगताप, प्रमोद गायकवाड, रुपाली सरनोबत व इतर.