...त्यामुळे संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषी पोरकट भाष्य : शिवाजीराव आढळराव-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 05:30 PM2024-05-03T17:30:34+5:302024-05-03T17:32:08+5:30
घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला....
मंचर (पुणे) : पराभव दिसू लागल्याने खासदार सैरभैर झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर खोटे आरोप करण्यापायी देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी ते पोरकट भाष्य करीत असल्याचा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला आहे.
आंबेगाव तालुक्यातील गावभेटीदरम्यान ते बोलत होते. आढळराव-पाटील म्हणाले, संसदेत मी ३७ प्रश्न विचारले; पण त्यात माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न होता असे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. त्या आरोपाचा पुरावा त्यांनी दिला तर मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जातो, नाहीतर कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर व्हावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना सुनावले.
साडेचार वर्षांत यांना कांदा प्रश्न कधीच दिसला नाही, निवडणूक आली की तीन महिन्यांपासून कांद्याविषयी ओरड त्यांनी सुरू केली; पण नरेंद्र मोदींनी एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. आपल्या कामातून सरकारने कोल्हेंच्या पोपटपंचीला आरसा दाखवल्याने त्यांचा कांद्याचा मुद्दा देखील सरकारने हिरावून घेतला आहे. कांद्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केले; पण त्यावर उत्तर काढता आले नाही. त्यामुळे घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला.
शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचाच विषय असेल तर त्यांनी पाच वर्षांत ४१ प्रश्न विचारले, तर मी ८२ प्रश्न विचारले होते. मी तुमच्यापेक्षा दुप्पट संख्येने प्रश्न उपस्थित केले. त्याचा तुम्हाला त्रास होतोय, यातूनच पराभव दिसू लागल्याने माझ्या कंपनीबद्दलच बोलणार असाल तर माझा प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाही, ती हार्डवेआरची आहे. मग मी सॉफ्टेवरचे प्रश्न कशाला विचारेल? याचे भान कोल्हेंना राहिलेले नाही.
कांदा प्रश्नाची दखल माझ्या पाठपुराव्यामुळे झाली आहे. तुम्ही फक्त तीन महिन्यांपासून कांदा, कांदा ओरडत होतात. निर्यातबंदी उठविण्याचा आग्रह मी डिसेंबरपासून धरला होता. त्यासाठी पीयूष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. माझ्या या मागणीला प्रतिसाद देऊन सरकारने बंदी उठवली. सुरुवातीला १०हजार, नंतर १० हजार आणि त्यानंतर एक लाख असे एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. ओरड करणाऱ्यांनी आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय केले, हे सांगू न शकणाऱ्यांनी खोटं बोलणं बंद करावं.