पुणे : पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. साहजिकच दरवेळेप्रमाणे यंदाही या सक्तीला विराेध करण्यात आला. परंतु 2018 या केवळ एका वर्षात हेल्मेट न घातल्यामुळे अपघातातमृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाहता हेल्मेट सक्ती का गरजेची आहे याचा अंदाज येताे. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रस्ते अपघातात हेल्मेट न घातल्यामुळे तब्बाल 184 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात दुचाकींचा वेग कमी असताे, तसेच जवळच्या अंतरावर जाताना हेल्मेट घेऊन जाणे शक्य नाही अशी कारणे नेहमी दिली जातात. परंतु अपघात झाल्यानंतर हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाहता हेल्मेट दुचाकीस्वाराच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज येताे. मागील वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत पुणे आणि पिंपरी चिंचवड या या दाेन्ही शहरांमध्ये 148 दुचाकीस्वारांना प्राणांना मुकावे लागले. यातील सर्वच दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. तसेच सप्टेंबर ते नाेव्हेंबर 2018 या कालावधीत पुणे शहरात 36 दुचाकी स्वारांचा अपघात हाेऊन ते मृत्यूमुखी पडले. यातील बहुतांश जणांनी हेल्मेट परिधान केले नव्हते.
त्यामुळे दुचाकीस्वारांचे प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी पुणे वाहतूक पाेलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून 500 रुपये इतका दंडही वसूल करण्यात येत आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम आता पुणेकरांवर हाेताना दिसत असून हेलम्टे घालणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू आता वाढत आहे. पुणे वाहतूक पाेलीस सीसीटिव्हीच्या माध्यमातून देखील हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.