बारामती : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) चा घटकपक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष तीनही कृषि कायद्यांचे समर्थनच करत आहे.तसेच, नवीन कृषी कायद्यांनंतरही शेती मालाची आधारभूत किंमत,हमीभाव,बाजार समित्यांचे आस्तित्व ‘जैसे थे’ राहणार असल्याची हमी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे रासप कृषि कायद्याचे समर्थन करीत आहे.
रासप यापुढेही एनडीएचा घटकपक्ष राहील, मात्र यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका रासप स्वबळावर लढणार असल्याची माहिती पक्षप्रमुख महादेव जानकर यांनी दिली. बारामती शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी विविध प्रभारी व निवडक कार्य कर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय संघटक पंडीतराव घोळवे होते.यावेळी जानकर म्हणाले, काँग्रेसप्रणित युपीए सरकारनेही अशा कृषीसुधारणांबाबत आग्रह धरलेला होता. आताही नवीन कायदे लागू झाल्यानंतरही बाजार समित्यांचे अस्तित्व, आधारभूत किंमत, हमीभाव ही धोरणे अबाधित राहाणार आहेत,याबाबत लेखी हमी केंद्र सरकारने दिलेली आहे. याउलट नवीन कायद्यांमुळे शेती क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढून शेतकऱ्याला अधिकचे चार पैसे मिळण्यात मदतच होणार आहे.मोदी विरोधक काही संघटनांच्या आडून नवीन कृषी विधेयकांबद्दल शेतकरी वर्गात भ्रम पसरविण्याचे काम करीत असल्याचे जानकर म्हणाले. मध्यंतरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहुचर्चित भेटीचा उल्लेख न करता जानकर यांनी कार्यकर्त्यांनी या चर्चांकडे दुर्लक्ष करावे,पक्षसंघटन मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे. जनतेच्या प्रश्नांवर किंवा व्यापक हितासाठी गरजेनुसार इतर पक्षाच्या प्रमुखांना, मंत्र्यांना भेटणे गैर नाही. कार्यकर्त्यांनी जनतेच्या स्थानिक प्रश्नांवर जनतेचा आवाज व्हावे. पक्षाच्या वतीने मार्च २०२१ अखेर ५० लाख सक्रीय सभासद नोंदणी केली जाईल. त्यासाठी अॅपची निर्मिती केली असल्याचे जानकर यांनी सांगितले.
यावेळी राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले, प्रभारी माणिकराव दांगडे पाटील, संदीप चोपडे, अॅड. अमोल सातकर ज्ञानेश्वर सलगर, आण्णासाहेब पाटील, नितीन धायगुडे,अजित पाटील, वैशाली विरकर, सुवर्णा जºहाड पाटील, कविता माने, पोपट क्षीरसागर, उमाजी चव्हाण, शरद बाचकर आदी उपस्थित होते. ----------------------------