किरण शिंदे
पुणे- विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काही हॉटेल चालत हे मनमानी करत आहेत. वेळेच्या आणि अटीशर्तीच्या निर्बंधाचे या हॉटेल चालकांनी वेळोवेळी उल्लंघन केले आहे. त्याच्यावर वेळोवेळी कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या वर्तनात कोणताही फरक पडत नाही. हे हॉटेलचालक जाणून बुजून प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे या हॉटेलवर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचा एफएल - 3 परवाना रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल ट्रॉप्सीहॉर्स, हॉटेल माफिया, हॉटेल बॅक स्टेज, हॉटेल रूढ लॉन्स, हॉटेल ॲटमॉस्फियर, हॉटेल एस्काड या हॉटेलची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली आहे.
पुणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे शहराचे अधीक्षक यांना हे पत्र पाठवले आहे. वर उल्लेख केलेले हॉटेल नेमून दिलेल्या वेळेत बंद करण्यात यावे यासाठी वारंवार नोटिसा दिल्या आहेत. प्रत्यक्षात जाऊन ही कारवाई केली आहे. मात्र तरीही रात्री उशिरापर्यंत ही हॉटेल्स सुरू असतात. तसेच या आस्थापनामध्ये दारू पिऊन, धिंगाणा करून हाणामारी आणि विनयभंगासारखे प्रकार घडू लागले आहेत. अशा प्रकारची दोन्हीही दाखल होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
वर उल्लेख केलेल्या हॉटेलमध्ये कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था नाही. या हॉटेलमध्ये ग्राहकांची भरपूर गर्दी होत असते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि संपत्तीची हानी होऊ शकते. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे एअरपोर्ट हे संवेदनशील ठिकाण म्हणून अलर्ट घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणू मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या सहा हॉटेल्स वर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करावी आणि त्यांचा एफएल - 3 परवाना रद्द करावा अशी मागणीच या पत्राद्वारे करण्यात आली आहे.