पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात; मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:51 PM2024-04-09T18:51:18+5:302024-04-09T18:52:14+5:30
माझ्या निवडणुकीला कधी माझी भावंड फिरली नाहीत. आता गरागरा पायाला भिंगरी बांधल्यासारख फिरत आहेत. तुमचा भाऊ होता त्यावेळी तुम्हाला फिरावेसे वाटल नाही
बारामती : बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे, फाॅर्म भरल्यावर शेवटची सभा होत असे. आता का सगळीकडे फिरावे लागते, का हि वेळ आली. आम्ही सांगत होतो आम्ही करतोय. आम्ही राज्य चालवू शकत नाही का, माझी प्रशासनावर पकड नाही का, हे सर्व करताना आम्ही आजही शाहु फुले,आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.
बारामती येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी ज्येष्ठ नेते पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह भावंडांवर देखील उपमुख्यमंंत्री पवार यांनी बाेचरी टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांवर देखील निशाणा साधला. पवार म्हणाले, ही निवडणुक तुम्हा सर्वांच्या हातात आहे. कृपया भावनिक हाेवु नका. काही काही गावांत वेगळे सुरु आहे. काय करायच कस करायच, या वयात त्यांना कसं सोडायचं, असे भावनिक होतील. पण तुम्ही प्रत्येकाला भरभरुन दिले आहे. आपले विकासाचे कामाचे दिवस आहेत. केंद्र आणि राज्याची जोड मिळाल्यास आपली प्रगती होणार आहे. त्यांच्या हातात काहीच नाही तर ते काय करणार, असा टोला यावेळी शरद पवार यांना त्यांनी लगावला.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांवर देखील टोले बाजी केली. पवार म्हणाले, माझ्या निवडणुकीला कधी माझी भावंड फिरली नाहीत. आता गरागरा पायाला भिंगरी बांधल्यासारख फिरत आहेत. तुमचा भाऊ होता त्यावेळी तुम्हाला फिरावेसे वाटल नाही. पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात. हे काही दिवसापुरते मर्यादित आहे. मतदान झाल्यावर छत्र्या परदेशात सफर करायला जातील. त्यांना तीच सवय आहे. मी अजुन फार तोलुनमापुन बोलतोय. एकदा जर मी तोंड उघडल यातील कित्येक लोकांना फिरता येणार नाही. तोंड दाखवता येणार नाही, मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का, इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिला.
...उमेदवारी मागे घेवु नये म्हणुन शिवतारे यांना आले रात्री आले फोन
अजित पवार म्हणाले, विजय शिवतारे यांनी मला त्यांना उमेदवारी मागे घेवु नये म्हणुन त्या दिवशी रात्री आलेले फोन दाखविले. ते फोन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देखील दाखविले. कोणत्या थराला राजकारण गेले आहे. ते फोन कोणी केले ते पाहुन खुप वाइट वाटले. इतक्या खालच्या पातळीवर जातात. ज्यांच्यासाठी जीवाचे रान केले. बाकी काही पाहिले नाही. मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा गाैप्यस्फेाट अजित पवार यांनी केला. यावेळी शिवतारे यांना आलेला फोन नेमका कोणाचा याबाबत चर्चा रंगली.
पुरंदरचे माजी आमदार दादा राजे जाधवराव यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी जाधवराव यांनी एक आठवण सांगितली. जाधवराव म्हणाले, मी ६९ वर्षांचा होतो. त्यावेळी तुझ्या काकांनी सभेत हा बैल म्हातारा झाला, त्या बैलाला बाजार दाखवा, असे भाषण केले. ज्यांना दैवत मानायचो, त्यांनी बैलाची उपमा दिली. मला काय वाटले असेल, अशी खंत जाधवराव यांनी व्यक्त करीत ती आठवण सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.
बारामतीत आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात साधारणत: १० हजार नोकऱ्या मिळाल्या. मात्र, काहींनी त्यावर टीका केली. दहा हजार कशाला म्हणतात, आपण कधी १ हजार नोकऱ्या तरी दिल्या का, असा टोला अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.