पुणे : राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी ‘यांच्या’ रुपाने पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झाली. सैनिकी कुटुंबात अमराठी आईच्या पोटी जन्माला येत ‘तिने’ मराठी चित्रसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. राजकारणात अजिबातच येण्याची इच्छा नसतानाही ‘यांनी’ पुण्यात नगरसेवक, महापौरपद भूषवत आता राज्यसभेच्या तालिकेपर्यंत घोडदौड केली. बड्या राजकीय-शैक्षणिक कुटुंबाच्या सावलीतून बाहेर पडत ‘या’ स्वकर्तुत्त्वावर वैद्यकीय क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करत आहेत. तर पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या बांधकाम क्षेत्रात ‘या’ दृढ निश्चयाने पाय रोवून उभ्या आहेत.
पाच कर्त्तुत्त्ववान महिलांच्या या पाच यशोगाथांमध्ये त्यांना कोणाचे साह्य झाले, हा प्रवास कसा होता याची रंजक कहाणी उलगडत गेली. निमित्त होते ‘लोकमत वुमेन अचिव्हर्स’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनाचे. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार अँड. वंदना चव्हाण, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भारती विद्यापीठ मेडिकल फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालिका अस्मिता कदम-जगताप आणि ग्रँव्हीट्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला.
“प्रत्येक क्षेत्रात वावरत असताना आजूबाजूला आपल्याबद्दल मत्सर, असूया वाटणारी माणसं असतात तशी आपल्या यशानं आनंदीत होणारीही असतात. चांगल्या कामाला प्रोत्साहन देणारे सहकारी आयुष्यात निश्चित येतात. त्यामुळे नकारात्मक व्यक्तींकडे दुर्लक्ष करत सकारात्मक विचारांच्या व्यक्तींची सोबत घेत वाट चालत राहायचे असते,” असा कानमंत्र या कर्त्तुत्त्ववान महिलांनी दिला. आमच्या कुटुंबियांचा पाठींबा आणि प्रेम यामुळेच आम्ही आजवरची वाटचाल करु शकलो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
लेखन-वाचनाचा पिंड असणाऱ्या डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “वाचनाचे स्वरुप गेल्या काही वर्षात खूप बदलले. आता शासकीय अहवालांचेच जास्त वाचन होते. दररोज दोन तास वाचन करण्याचा पण कटाक्षाने पाळते. राजकारणातल्या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना सर्व विषयांचा चौैफेर अभ्यास करावा लागतो. दररोज डायरी लिहिण्याचीही सवय मी स्वत:ला लावून घेतली आहे. खूप तणावात असते तेव्हा मात्र भगवदगीता वाचते.”
अॅड. चव्हाण म्हणाल्या की, राज्यसभेत तीन मिनिटांचे भाषण करायचे असेल तरी रात्रभर अभ्यास करावा लागतो. तरी पुस्तके अजूनही वाचण्याच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये आहेत. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ संदर्भात देशभर काम करते आहे. संसदेत प्रश्न मांडते. पण या दिशेने लोकांमध्ये पुरेशी जागृती अजून व्हायची आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना आरोग्यदायी पर्यावरण शिल्लक ठेवायचे असेल तर हा विषय ऐरणीवर आला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
‘सोनाली कुलकर्णी’ याच नावाची अभिनेत्री आधीच कार्यरत असल्याने आव्हाने आली का, या प्रश्नाला उत्तर देताना सोनाली म्हणाली, ‘‘स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणे हे दुप्पट मोठे आव्हान होते. मी अभिनय शिकून आले नव्हते. मराठी धड बोलता येत नव्हते. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून शिकण्याची वृत्ती ठेवली. विविध चित्रपट पाहणे हे माझ्या क्षेत्रासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काय करायचे आहे आणि काय नाही हे समजण्यास मदत होते.”
अस्मिता कदम-जगताप म्हणाल्या, “आमच्या घरात वाचनसंस्कृती आम्ही आवर्जून जोपासली आहे. टीव्ही पाहणार की पुस्तक वाचणार असे कोणी विचारले तर माझ्या घरात उत्तर मिळेल की ‘पुस्तक वाचू.’ दररोज झोपण्याआधी किमान एक तास वाचन करायचे, असा आमच्या घरचा दंडकच आहे.” वडील मोठे राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ असल्याने तुम्हाला अभ्यास करायची काय गरज, असे टोमणे लहानपणी ऐकवले गेले. त्यामुळे अधिक अभ्यास करुन स्वत:ला सिद्ध करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
उषा काकडे म्हणाल्या, “मी १५ वर्षांपूर्वी घरच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. मी काम शिकून घ्यायला, नवीन गोष्टी जाणून घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांचा सुरुवातीला पाठिंबा मिळाला नाही. मात्र, आई माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली. आपण स्वत:ला सिध्द करायचेच असा पण मी मनाशी केला आणि त्यात यशस्वी झाले.” समाजाचे देणे देण्यासाठीही आता विविध समाजोपयोगी कामे करत असते, असे त्यांनी सांगितले.